सर्पदंशामुळे मृत्यू ओढावण्याची शक्यता असल्यामुळे सामान्यत: सापांबद्दल भीती असते. विषारी आणि बिनविषारी अशा दोन्ही प्रकारचे साप अस्तित्वात असले तरीही सर्पदंश म्हटला की, पायाखालची जमीन सरकतेच. मात्र, साप कधी दंश करतात, त्यांची मानसिकता कधी आक्रमक असते आणि कोणत्या प्रकारचे साप कोणत्या वातावरणात दंश करू शकतात, याची माहिती मिळाल्यास सर्पदंशाचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. याबाबतचे संशोधन करण्यासाठी ब्राझीलच्या एका जीवशास्त्रज्ञाने विषारी सापांवर एक अत्यंत वेगळा प्रयोग केला आहे.

विषारी साप एखाद्याचा चावा कधी घेऊ शकतात, याचा शोध घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला. विशेष म्हणजे त्यांनी हा अभ्यास करण्यासाठी वापरलेली पद्धत फारच हटके होती. एखाद्या अत्यंत विषारी सापाच्या जवळ जाण्याचा किंवा त्याच्यावर मुद्दामहून पाय देण्याचा प्रयत्न केल्यानंतर विषारी साप कशापद्धतीने प्रतिक्रिया देतो, याच्या निरीक्षणातून त्यांनी हा अभ्यास केला आहे. या अभ्यासासाठी त्यांना अक्षरश: हजारो वेळा सापांवर पाय देण्याचा प्रयोग करत आपला जीव धोक्यात घालावा लागला.

हेही वाचा : बालसुधारगृह म्हणजे काय? पुणे पोर्श अपघातातील आरोपीचा दिनक्रम कसा असेल?

बुटंटन इन्स्टिट्यूटचे जीवशास्त्रज्ञ जोआओ मिगुएल अल्वेस-नुनेस यांनी हे संशोधन केले आहे. या संशोधनासाठी त्यांनी घोणस प्रजातीतील सापाच्या (Jararacas) एका प्रजातीवर प्रयोग केले. हा विषारी साप दक्षिण अमेरिकेत आढळतो. उपलब्ध आकडेवारीनुसार, वर्षाला जवळपास २० हजार लोक त्याच्या दंशाला बळी पडतात. हा साप अत्यंत विषारी असल्याने जीवशास्त्रज्ञ अल्वेस-नुनेस यांनी केलेला हा प्रयोग जीवघेणा होता. मात्र, त्यांनी यशस्वीरित्या हे संशोधन पूर्ण केले आहे. या संशोधनातून गोळा केलेले निष्कर्ष ‘नेचर’ या जर्नलमध्ये मे महिन्याच्या अंकात प्रकाशित झाले आहेत.

या अभ्यासातून काय निष्पन्न झाले?

‘सायन्स’ जर्नलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अल्वेस-नुनेस यांनी म्हटले की, या विषयावर याआधी फारच कमी संशोधन झाले आहे. नेमक्या कोणत्या कारणांमुळे साप चावतो आणि त्याची दंश करण्याची मानसिकता नेमकी कधी होते, यावर एक चांगले संशोधन होण्याची गरज होती.

सापांबद्दल आणि त्यांनी दंश करण्याबद्दल अनेक प्रकारचे गैरसमज आहेत. स्पर्श केल्यावर अथवा चुकून पाय पडल्यावरच घोणससारखा विषारी साप चावतो, असा लोकांचा समज आहे. मात्र, तसे नाही. हा अभ्यास करताना अल्वेस-नुनेस यांनी खबरदारी म्हणून पायाचे संरक्षण करणारे विशेष स्वरुपाचे बूट घातले होते. या संशोधनासाठी त्यांनी सापांना स्पर्श करण्याची किंवा त्यांच्यावर अलगद पाय ठेवण्याची पद्धत वापरली.

या सगळ्या प्रयोगाबद्दल बोलताना अल्वेस-नुनेस म्हणाले की, “मी सापांच्या जवळ जायचो आणि अगदी अलगदपणे त्यांच्या शरीरावर पाय द्यायचो. अर्थात, मी माझ्या शरीराचे संपूर्ण वजन सापांवर द्यायचो नाही. सापांना दुखापत करणे हा माझा उद्देश नव्हता, त्यामुळे मी ते केलेले नाही. साप नेमक्या कोणत्या कारणास्तव दंश करण्यासाठी प्रवृत्त होतात, त्याचा शोध मला घ्यायचा होता. त्यासाठी त्यांना डिवचणे गरजेचे होते. मी ११६ सापांवर हा प्रयोग केला. यातील प्रत्येक सापावर मी तीसवेळा पाय दिला आहे. एकूण ४०,४८० वेळा मी पाय देण्याचा प्रयोग करून पाहिला.”

अल्वेस-नुनेस यांच्या मते घोणस चावण्याची शक्यता त्याच्या आकाराच्या व्यस्त प्रमाणावर अवलंबून होती. “थोडक्यात, जर साप लहान आकाराचा असेल तर तो दंश करण्याची शक्यता अधिक, असा निष्कर्ष मला आढळून आला.”, असे ते म्हणाले. या अभ्यासामध्ये नर आणि मादी अशा स्वरूपातही भिन्न निष्कर्ष निघाल्याचे दिसून आले. नरांपेक्षा मादी साप अधिक आक्रमक असल्याचे हे संशोधन सांगते. वयाने लहान असलेला मादी साप दिवसा अधिक आक्रमक असण्याची शक्यता असते, असे या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड रक्ताचे सरपटणारे प्राणी अधिक सक्रिय असतात आणि त्यांच्यात जास्त ऊर्जा असते; त्यामुळे अधिक उष्ण हवामानामध्ये सापांनी दंश करण्याचे प्रमाण अधिक असते. या संशोधनानुसार सापांच्या शरीरावर मध्यभागी अथवा इतर कोणत्याही ठिकाणी स्पर्श करण्यापेक्षा त्यांच्या डोक्यावर स्पर्श केल्यास त्यांच्याकडून दंश होण्याची शक्यता अधिक वाढते.

प्रतिविषाचा पुरवठा वाढवण्यासाठी संशोधन उपयुक्त

अल्वेस-नुनेस यांनी म्हटले की, या संशोधनातून प्राप्त झालेले निष्कर्ष अनेक गोष्टींसाठी फायद्याचे ठरतील. ब्राझीलमधील सर्पदंशाच्या घटना कमी करण्यासाठी या संशोधनातील निष्कर्ष कामाला येऊ शकतात. पुढे ते म्हणाले की, “या संशोधनाद्वारे प्राप्त झालेल्या नव्या निष्कर्षाद्वारे आपण सर्पदंश कधी होऊ शकतो, याचा अंदाज बांधू शकतो. हा अंदाज बांधता आल्यामुळे प्रतिविष मिळवण्यासाठी अधिक चांगल्याप्रकारे योजना करता येईल.”

“सापांचे प्रमाण दर्शविणाऱ्या इतर अभ्यासांमधील आकडेवारीसह आम्ही केलेल्या संशोधनातील निष्कर्ष एकत्र करून कोणत्या ठिकाणचे साप अधिक आक्रमक आहेत, याचीही पूर्वपडताळणी करता येऊ शकते. उदाहरणार्थ, प्रतिविष मिळवण्यासाठी मादी सापांची संख्या जास्त असलेली आणि उष्ण हवामान असलेली ठिकाणे प्राधान्यक्रमावर असायला हवीत.”

हेही वाचा : न्यायाधीशांना राजकीय भूमिका घेते येते का? न्यायाधीशांच्या ‘त्या’ वक्तव्याने या मुद्यावर चर्चा

संशोधकाला प्रतिविषाचीच ॲलर्जी

अल्वेस-नुनेस म्हणाले की, हे संशोधन करताना त्यांना १०० टक्के सुरक्षित वाटत होते. पायांचे संरक्षण करणारे विशेष स्वरुपाचे बूट घातल्यामुळे सर्पदंशाची भीती फारशी वाटत नव्हती. संस्थेतील अनुभवी सहकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार या बुटांची निवड करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यांना विशेष स्वरुपाच्या बुटांच्या वापरामुळे हा प्रयोग करताना घोणस प्रजातीतील सापाचा दंश आजवर होऊ शकला नाही. मात्र, ‘रॅटलस्नेक’चा (शेपटीने खडखड असा आवाज करणारा एक विषारी साप) दंश झाला होता. त्यामुळे अल्वेस-नुनेस यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. याबाबत बोलताना सायन्स जर्नलला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले की, “या सर्पदंशामुळे एक वेगळीच माहिती माझ्या निदर्शनास आली. प्रतिविष आणि सापाचे विष या दोन्हीही गोष्टींची मला ॲलर्जी असल्याचे निदान झाले. त्यामुळे, दुर्दैवाने मला १५ दिवसांची वैद्यकीय रजा घ्यावी लागली. मात्र, जीवशास्त्रज्ञ म्हणून या कामावर माझे प्रेम असल्याने मी पुन्हा संशोधनाकडे वळलो. मी या माहितीचा वापरही माझ्या अभ्यासासाठी करत आहे.” पुढे ते म्हणाले की, “मी आता रॅटलस्नेक आणि घोणस प्रजातीतील साप यांच्या सर्पदंशाच्या प्रभावाचा तुलनात्मक अभ्यास करत आहे. त्यांचा सर्पदंश टाळण्यासाठी कोणत्या साहित्यापासून तयार केलेले कोणते बूट किती प्रभावी ठरू शकतात, याचाही अभ्यास मी करतो आहे.”