ब्रिटनमधील सर्वात जुने आणि प्रसिद्ध असलेले भारतीय रेस्टॉरंट बंद होण्याच्या मार्गावर आहे. ब्रिटनमध्ये हे रेस्टॉरंट ९९ वर्षांपासून उभे आहे. काही महिन्यात या रेस्टॉरंटला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत, मात्र त्याच्या काही महिन्यांपूर्वीच हे रेस्टॉरंट बंद होणार असल्याचे वृत्त पसरताच त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. १९२६ मध्ये या रेस्टॉरंटची सुरुवात झाली होती. खाद्य जगतातील सर्वात मोठी पदवी मानल्या जाणाऱ्या मिशेलिन-स्टारने या रेस्टॉरंटला गौरविण्यात आले आहे. या रेस्टॉरंटचे नाव आहे ‘विरस्वामी’. सर्वात जुने असलेले रेस्टॉरंट बंद का होत आहे? रेस्टॉरंटचा इतिहास काय? या रेस्टॉरंटला कोणकोणत्या दिग्गजांनी भेट दिली? जाणून घेऊ.
नेमके प्रकरण काय?
क्राउन इस्टेटशी झालेल्या वादामुळे आता रेस्टॉरंट बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण जवळजवळ एक शतकापासून रेस्टॉरंट ज्या इमारतीत आहे, ती इमारत रेस्टॉरंटच्या मालकीची नाही. ही इमारत क्राउन इस्टेटच्या मालकीची आहे. क्राउन इस्टेट काय याची अनेकांना माहिती नाही. तर क्राउन इस्टेट म्हणजे राजाच्या मालकीचे. ही एक स्वायत्त संस्था आहे. या संस्थेकडे ब्रिटनमधील अनेक प्रतिष्ठित जागांची मालकी आहे. ही संस्था रिअल इस्टेट कंपन्यांना त्या जागा भाडेकराने वापरण्याकरिता देते. या कंपन्यांकडून मिळणारे भाडे सरकारी तिजोरीत आणि राजघराण्याला दिले जाते.
क्राउन इस्टेट विरुद्ध वीरस्वामी वाद काय?
ब्रिटनमधील सर्वात जुने भारतीय रेस्टॉरंट असलेले वीरस्वामीचे अस्तित्व क्राउन इस्टेटशी झालेल्या वादामुळे धोक्यात आले आहे. हे रेस्टॉरंट लंडन येथील भारतीयांना आणि लंडनमधील नागरिकांना भारतीय व्यंजनाची अनेक वर्षांपासून ओळख करून देत आहे. परंतु, मिशेलिन स्टार पुरस्काराने गौरविण्यात आलेले हे रेस्टॉरंट लवकरच बंद होणार आहे. व्हिक्टरी हाऊसचे मालक असलेल्या क्राउन इस्टेटने रेस्टॉरंटच्या मालकांना एक मेल पाठवला. या मेलमध्ये त्यांनी जूननंतर भाडेकरार वाढवून देण्यास नकार दिला.
वीरस्वामी रेस्टॉरंटचे सह-मालक असलेले रणजित मथराणी यांनी सांगितले, गेल्या वर्षी इस्टेटने त्यांना इमारतीत अधिक जागा हवी आहे का असे विचारले होते. त्यावेळी रेस्टॉरंटने त्यांची ऑफर नाकारली होती, कारण त्यांना खात्री नव्हती की त्यांच्याकडे अतिरिक्त ग्राहक येतील. या नकारानंतरच हा निर्णय आला असल्याचे त्यांचे सांगणे आहे. मात्र, क्राउन इस्टेटचा असा दावा आहे की, इमारतीच्या वरच्या मजल्यावरील कार्यालयांसाठी तळमजल्यावरील एन्टरन्स क्षेत्र वाढवायचे असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे,. वीरस्वामी रेस्टॉरंटची जागा त्यांना मिळाल्यास त्यांना अतिरिक्त ११ चौरस मीटर जागा मिळेल.
‘द टाईम्स’ने दिलेल्या एका वृत्तानुसार क्राउन इस्टेटचे म्हणणे आहे की, त्यांना वीरस्वामीच्या जागेची आवश्यकता आहे जेणेकरून ते संपूर्ण इमारतीचे १२ महिन्यांचे नूतनीकरण पूर्ण करू शकतील. एका निवेदनात क्राउन इस्टेटने म्हटले, “आम्हाला व्हिक्टरी हाऊसचे नूतनीकरण करावे लागेल. या इमारतीमध्ये मर्यादित पर्याय उपलब्ध असल्यामुळे आम्हाला रेस्टॉरंटचे प्रवेशद्वार काढून टाकावे लागेल. त्यामुळेच आम्ही वीरस्वामी रेस्टॉरंटला त्यांची भाडे करार मुदत संपल्यानंतर मुदतवाढ देऊ शकणार नाही.”
मथराणी यांनी सांगितले की, त्यांनी राजाच्या मालमत्ता विकासकाला त्यांच्यासाठी इतरत्र जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती, परंतु त्यांनी त्या विनंतीस नकार दिला होता. त्यांनी सांगितले, आता हे प्रकरण न्यायालयात जाणार आहेत, जर राजघराण्याला रेस्टॉरंटमधील बदलांची माहिती दिली गेली तर ते आनंदी होणार नाहीत. “राजघराणे जिवंत इतिहासावर विश्वास ठेवतात. हे फक्त एक संग्रहालय नाही. मला वाटते की ही संस्था इतकी निर्दयी असेल राजघराण्यालादेखील निराशा होईल,” असे त्यांनी ‘द गार्डियन’ला सांगितले.
वीरस्वामी रेस्टॉरंटचा इतिहास काय?
वीरस्वामी रेस्टॉरंट १९२६ साली सुरू करण्यात आले. या रेस्टॉरंटची सुरुवात एडवर्ड पामर यांनी केली होती. एडवर्ड पामर हे निवृत्त ब्रिटिश भारतीय सैन्य अधिकारी होता आणि ते जनरल विल्यम पामर आणि मुघल राजकुमारी फैसान निसा बेगम यांचे पणतू होते. १९३४ साली विल्यम स्टीवर्ट यांनी वीरस्वामी रेस्टॉरंटची जबाबदारी स्वीकारली. वीरस्वामी रेस्टॉरंटला अनेक राजकीय नेत्यांनी भेट दिली आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी रेस्टॉरंटमधील पदार्थांचा आस्वाद घेतला.
दिग्गज अभिनेते चार्ली चॅप्लिन यांनीदेखील वीरस्वामी रेस्टॉरंटला भेट दिली आहे. ब्रिटनचे प्रिन्स एडवर्ड यांनीही या रेस्टॉरंटला वारंवार भेट दिली आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि हॉलिवूडचे मार्लन ब्रँडो यांनीही वीरस्वामी येथील पदार्थांचा आस्वाद घेतला आहे. रेस्टॉरंटच्या वेबसाइटनुसार, विल्यम स्टीवर्ट यांनी १९६७ मध्ये या रेस्टॉरंटची जबाबदारी सोडली. १९९६ मध्ये, रेस्टॉरंटची जबाबदारी सध्याचे मालक नमिता पंजाबी आणि रणजित मथराणी यांनी घेतली. २००८ मध्ये, रेस्टॉरंटने बकिंगहॅम पॅलेसमध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या एका कार्यक्रमासाठी जेवणाची व्यवस्थाही केली होती.