यंदा होत असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी नेहमीप्रमाणे भारताचा सर्वाधिक खेळाडूंचा संघ पाठविण्यात येणार आहे. सर्व क्रीडाप्रकारांतील खेळाडूंचा समावेश असलेल्या ऑलिम्पिक पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी भारताची पाच वेळची जगज्जेती बॉक्सर मेरी कोम हिच्यावर टाकण्यात आली होती. मात्र, मेरीने वैयक्तिक कारणासाठी ही जबाबदारी पेलण्यास नकार दिला आहे. ऑलिम्पिक पथकप्रमुखाची जबाबदारी काय असते, मेरीने ही जबाबदारी का सोडली, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

ऑलिम्पिकमधील पथकप्रमुख म्हणजे काय?

जेव्हा एकाच देशात एकापेक्षा अधिक क्रीडा प्रकारांची स्पर्धा होत असते, तेव्हा खेळाडू, प्रशिक्षक, सहायक, वैद्यकीय अधिकारी, बॅंक अधिकारी आदींचा समावेश असलेल्या पथकातील सदस्यांची संख्या मोठी असते. परदेशात गेल्यावर यातील प्रत्येकाला स्पर्धेविषयीची माहिती स्वतंत्रपणे घेणे शक्य होत नाही. त्यामुळे या पथकासाठी एका प्रमुखाची निवड केली जाते. पथकप्रमुखाची जबाबदारी खूप मोठी आणि कठीण असते, कारण परदेशी अधिकारी, स्पर्धा संयोजन समिती आणि त्या-त्या देशांची ऑलिम्पिक संघटना यांच्यामधील दुवा म्हणून या व्यक्तीला काम करायचे असते. पथकातील प्रत्येकाची जबाबदारी या व्यक्तीवर असते. प्रत्येकाच्या खाण्याची, राहण्याची, प्रवासाची, स्थानिक संपर्काची जबाबदारी या व्यक्तीला पार पाडायची असते. संघाविषयी घडलेल्या यशस्वी घटनांबरोबरच छोट्यातल्या छोट्या चुकीसाठी त्याला जबाबदार धरण्यात येते.

हेही वाचा – विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  

पथकप्रमुख व ध्वजवाहक यांच्यात काय फरक?

या दोन्हींचा थेट कसलाच संबंध नाही. ऑलिम्पिक पथकप्रमुख ही जबाबदारी आहे, तर ध्वजवाहक हा सन्मान आहे. आपल्या देशाचा ध्वज अशा मोठ्या स्पर्धांच्या उद्घाटन सोहळ्यात वाहून नेण्याची प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. ती जबाबदारी पेलणारा हा पथकप्रमुख नव्हे. हा ध्वजवाहक फक्त उद्घाटन सोहळ्यासाठीच असतो, तर ऑलिम्पिक पथकप्रमुखाचे काम संघातील खेळाडू स्पर्धा असलेल्या देशात पाऊल ठेवल्यापासून सुरू होते.

निवड कोण करते?

या दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठीच्या व्यक्तींची नावे ही त्या-त्या देशातील ऑलिम्पिक संघटनेची जबाबदारी असते. राष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनाच ही दोन्ही नावे निश्चित करत असतात. यात सरकारचा कुठेही हस्तक्षेप नसतो. सरकारचा हस्तक्षेप आल्याचा जरादेखील संशय आला, तर राष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेवर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडून तातडीने बंदी घालण्यात येते. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने ही बंदी एकदा सहन केली आहे. पथकप्रमुख शासकीय अधिकारीच असावा किंवा खेळाडूच असावा, असे काही बंधन नाही. यापूर्वी भारताचे प्रथकप्रमुख म्हणून अनेक खेळाडूंनी जबाबदारी सांभाळली आहे. ध्वजवाहक ही जबाबदारी त्या देशातील सर्वोत्तम खेळाडूवर सोपविण्यात येते. आतापर्यंत केवळ एकच ध्वजवाहक असायचा. मात्र, टोकियो ऑलिम्पिकपासून पुरुष आणि महिला अशा दोन सर्वोत्तम खेळाडूंना हा सन्मान देण्यात येतो.

हेही वाचा – विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?

मेरी कोमने राजीनामा का दिला?

बॉक्सर मेरी कोमची ऑलिम्पिक पथकप्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती, तर ध्वजवाहक म्हणून पुरुष खेळाडूची निवड केली होती. तेव्हापासून ऑलिम्पिक संघटनेत अंतर्गत खदखद सुरू होती. एकीकडे पी. टी. उषा आणि दुसऱ्या बाजूला सर्व पदाधिकारी, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. या दोन्ही नावांच्या घोषणा करण्याची उषा यांनी घाई केली आणि त्या आपले निर्णय थोपवत असल्याची या दुसऱ्या गटाची तक्रार आहे. ध्वजवाहकही केवळ पुरुष खेळाडू जाहीर केला, महिला खेळाडूचे नावही जाहीर करायला हवे होते, असा सूरही या गटाने आळवला. मेरी कोम ही भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या खेळाडू समन्वय समितीची अध्यक्ष आहे. या समितीचेही अनेक सदस्य उषा यांच्या विरोधात आहेत. अशा वेळी कुणाच्या बाजूने उभे राहायचे, याबाबत मेरीची द्विधा मनःस्थिती झाली असावी. हे सगळे दडपण सहन करणे मेरीला शक्य झाले नसावे, असे त्यांच्या राजीनाम्यामागील कारण खासगीत सांगितले जाते. प्रत्यक्षात मेरीने कौटुंबिक जबाबदारी असल्यामुळे माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता, असे कारण दिले आहे.

नव्या पथकप्रमुखाची निवड कशी करणार?

पथकप्रमुखाची ठोस अशी निवड प्रक्रिया नसते. त्याच्या नावाची घोषणा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने सेवाज्येष्ठतेनुसार केली जाते. यात कधी संघटक, प्रशासक, प्रशिक्षक किंवा खेळाडू यापैकी कुणाचीही निवड होऊ शकते. या वेळी पॅरिस ऑलिम्पिकसाठी हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडू शिवा केशवन हा उपपथकप्रमुख आहे. ऑलिम्पियन गगन नारंगवर नेमबाजी संघाची जबाबदारी स्वतंत्रपणे सोपविण्यात आली आहे, कारण ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी केंद्र मुख्य केंद्रापासून जवळपास ३०० किलोमीटर दूर आहे. क्रीडा वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ डॉ. दिनशॉ पारडीवाला यांची वैद्यकीय प्रमुख म्हणून निवड केली गेली आहे. आता मेरीच्या जागेवर कदाचित शिवाची निवड होऊ शकते आणि तेथे नव्या व्यक्तीची निवड केली जाईल किंवा मेरीच्याच जागी नव्या व्यक्तीची निवड केली जाईल. भारतीय ऑलिम्पिक संघटनेला अजून महिला ध्वजवाहकाचेही नाव जाहीर करायचे आहे.