भारतीय संस्कृती ही आपल्या वैविध्यपूर्ण प्रथा व परांपरांसाठी ओळखली जाते. या प्रथा, परंपरा हिंदू संस्कृतीचे अविभाज्य अंग मानल्या जातात. याच परंपरेतील एक परंपरा म्हणजे कुंकू लावणे. कुंकू लावण्याच्या वेगवेगळ्या प्रथा देशात अस्तित्त्वात असल्याचे लक्षात येते. उत्तर भारतात लग्नाच्या वेळी भांगेत कुंकू भरण्याची प्रथा आहे तर दक्षिणेकडे विवाहित स्त्रिया भांगेत कुंकू भरण्याऐवजी कपाळावर कुंकू लावतात. इथे महत्त्वाचा भाग म्हणजे भारतीय संस्कृतीत कपाळावर गंध, टिळा लावणे ही परंपरा स्त्री व पुरुष दोघांमध्येही सामान्य असली तरी कुंकू लावणे हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते. क्वचित प्रसंग वगळता विवाहित स्त्रियांनी लाल कुंकू लावण्याची प्रथा आपल्याकडे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संस्कृतीत तिलक किंवा टिळा कोणत्या माध्यमांचा वापर करून लावतात?

भारतात कुंकू, हळद, चंदन, अष्टगंध, भस्म यासारख्या वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून कपाळावर दोन भुवयांच्या मध्यभागी तिलक वा टिळा लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून प्रचलित आहे. तिलक लावण्याची माध्यमे वेगवेगळी असली तरी तिलक कपाळाच्या मध्यभागी लावण्याच्या मागे शास्त्रीय कारण सांगितले जाते. तिलकाचे आकार हे प्रांतपरत्वे, वेगवेगळ्या धार्मिक संप्रदाय आणि त्यांच्या संकेतांनुसार बदलतात. वैष्णवांमध्ये लावण्यात येणाऱ्या उभ्या तिलकाला ऊर्ध्व पुंड्र असे म्हणतात, तर शैव संप्रदायात लावण्यात येणाऱ्या आडव्या तिलकांना त्रिपुंड्र असे संबोधले जाते. शाक्त संप्रदाय हा देवीला प्रधान मानणारा संप्रदाय आहे. या संप्रदायात गोल तिलक, लाल कुंकू लावण्याची प्रथा आहे. किंबहुना बळी दिल्यानंतर रक्ताचा टिळा लावण्याची प्रथाही या संप्रदायात अस्तित्त्वात होती.

आणखी वाचा: विश्लेषण: महाभारत खरंच घडले होते का? काय सांगतात पुरातत्त्वीय पुरावे?

तिलक किंवा कुंकू लावण्यामागे काही शास्त्रीय कारण आहे का ?

कुंकू किंवा गंध लावण्याच्या प्रक्रियेत भुवयांच्या मध्यभागी असलेल्या भ्रूमध्य आणि आज्ञाचक्र यांवर दाब दिला जातो, असे योगशास्त्रात म्हटले आहे. यामुळे चेहऱ्यावरील स्नायूंना रक्त प्रवाह मिळण्यास मदत होते. आपल्या शरीरात सात मुख्य चक्रे असतात, असे योगशास्त्र सांगते. त्यात मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञाचक्र, सहस्त्रार चक्र इत्यादींचा समावेश होतो. आज्ञाचक्राची देवता ‘आत्मा’ ही आहे व हे चक्र आपल्या डोळ्यांशी संबंधित आहे. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी या चक्रावर पडणारा दाब योगशास्त्रामध्ये महत्त्वाचा मानला जातो.

स्त्रिया वापरत असलेले कुंकू कसे तयार केले जाते?

कुंकू हे मूलतः हळद व लिंबाच्या रसाच्या एकत्रित मिश्रणातून तयार करण्यात येते. हळद व लिंबाचा रस यांचे मिश्रण वाळवून जे मिश्रण तयार होते ते म्हणजे कुंकू. यात हळद हा मुख्य घटक आहे. म्हणूनच कुंकू व विवाहित स्त्री यांचा संबंध जवळचा आहे.

कुंकू आणि सिंदूर यांच्यात नेमका फरक काय आहे?

उत्तर भारतात वापरण्यात येणारे सिंदूर हे cinnabar (सिनबर) म्हणजेच मर्क्युरिक सल्फाइड (mercuric sulfide)पासून तयार करण्यात येते. cinnabar हे ज्वालामुखी आणि अल्कधर्मी गरम पाण्याच्या झऱ्यांच्या जवळ असलेल्या भेगांमध्ये खनिज स्वरूपात आढळते. प्राचीन भारतात या खनिजापासून तयार करण्यात येणारा लाल रंग चित्रांमध्ये वापरण्यात येत होता.

आणखी वाचा: विश्लेषण: स्वस्तिक: मांगल्य ते रक्तरंजित इतिहास व्हाया अ‍ॅडॉल्फ हिटलर

तिलक/कुंकू लावण्याची प्रथा जगात इतर कोणत्या देशांमध्ये अस्तित्त्वात आहे?

भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि श्रीलंका तसेच आग्नेय आशियातील इंडोनेशिया, फिलिपाइन्स, मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम आणि म्यानमार आदी देशांमध्ये तिलक/कुंकू लावण्याची प्रथा आजही अबाधित असल्याचे लक्षात येते. Huadian (ह्यूडियन) हा प्रकार चीन या देशात आढळतो. चीनमधील स्त्रिया लाल रंगाचा वापर करून आपले कपाळ सुशोभित करत असत. विशेष म्हणजे भुवयांच्या मध्यभागी पानाफुलांच्या नक्षीने ही तिलक लावण्याची प्रथा होती. त्यामुळे एकूणच आशियात कमी- अधिक फरकाने अशा स्वरूपाच्या परंपरा अस्तित्त्वात आहेत असे लक्षात येते.

कलेतून दिसणारी तिलकाची प्राचीनता

भारतात प्राचीन इतिहास सांगणारी अनेक स्थापत्ये आहेत. यात मंदिरे, लेणी यासारख्या वास्तूंचा समावेश होतो. या वास्तूंच्या भिंतींवर वेगवेगळी शिल्प, चित्रे आपण पाहू शकतो. या शिल्पामधून आपल्याला तत्कालीन समाजातील प्रथा-परंपरा यांविषयी माहिती कळते. त्यामुळेच प्राचीन भारतात तिलक, कुंकू लावण्याची प्रथा कशा प्रकारे होती यासाठी हा वस्तुनिष्ठ पुरावा मानला जातो. भारतात प्राचीन काळापासून हिंदू, बौद्ध, जैन या तीनही पंथांमध्ये कपाळावर तिलक लावण्याची प्रथा होती. याचे उत्तम उदाहरण आपण मध्यप्रदेश मधील भारहुत येथे सापडलेल्या स्तूपाच्या शिल्पांमध्ये पाहू शकतो. या स्तूपावर रेखाटलेल्या द्वारपालिकांच्या कपाळावर असलेले टिकली सदृश्य नक्षीकाम तिलक किंवा कुंकू लावण्याची प्राचीनता इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात नेते. किंबहुना बुद्ध,बोधिसत्त्व व इतर बौद्ध देवता यांच्या कपाळावर जे तिलक सदृश्य नक्षीकाम दिसते त्यास ऊर्ण असे म्हटले जाते. ऊर्ण हे बुद्धाच्या ३२ लक्षण चिन्हापैकी एक आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीत एकूणच तिलक, कुंकू लावण्याची परंपरा अति प्राचीन आहे हे समजण्यास मदत होते!

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is applying sindur important in indian culture and since when did this custom come into existence svs