जगातील प्रमुख तेल निर्यातदार देश अशी ओळख असलेल्या सौदी अरेबियाला आता आपली ही ओळख ओलांडून पुढे जायचे आहे. तेलाच्या निर्यातीवर या देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा आहे हे खरे, मात्र आता केवळ तेलकेंद्री अर्थव्यवस्था न ठेवता सौदी अरेबियाला अर्थव्यवस्थेत विविधता आणायची आहे. यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक धोरणात्मक आणि परंपरेच्या चौकटी मोडणारे निर्णय या देशाने घेतले आहेत. याच निर्णयसाखळीतील आणखी एक दुवा म्हणजे ऑस्करविजेते हान्स झिमर यांच्यावर राष्ट्रगीत बदलण्याची दिलेली  कामगिरी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आश-अल मलिक’

सौदी अरेबियाच्या राष्ट्रगीताचे नाव ‘आश-अल मलिक’ असे आहे. आश-अल- मलिक म्हणजे राजा चिरायु होवो. हे गीत मूळ १९४७ मध्ये लिहिले गेले आहे. इजिप्शियन संगीतकार अब्दुल रहमान अल- खतीब यांनी या गीताची रचना केली होती. आता झिमर यांनी या गीताला आधुनिक वाद्यांचा साज चढवून त्याची नवी आवृत्ती (व्हर्जन) आणायची आहे.

झिमर यांचे गाजलेले सिनेमे

ऑस्करविजेते झिमर यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांतील संगीताची बाजू सांभाळली आहे. ‘द लायन किंग’, ‘ग्लॅडिएटर’, ‘ब्लॅक हॉक डाऊन’, ‘ड्यून’, ‘द डार्क नाइट’ ट्रायोलॉजी आणि क्रिस्टोफर नोलान यांच्या अनेक सिनेमांना झिमर यांनी संगीत दिलेले आहे. झिमर हे सौदी अरेबियाच्या राष्ट्रगानाचे नवे व्हर्जन आणण्यास राजी झाले असल्याच्या माहितीला जनरल एंटरटेनमेंट ऑथोरिटीचे अध्यक्ष तुर्की अलअलशेख यांनी दुजोरा दिला आहे. तुर्की अलअलशेख हे सौदी रॉयल कोर्टचे सल्लागार आहेत. झिमर यांनी त्यांची अलिकडेच भेट घेतली होती. झिमर यांच्याकडे केवळ राष्ट्रगानाचीच जबाबदारी नाही. ‘अरबिया’ या सौदीच्या प्रेरणा गीतावरही झिमर कार करीत आहेत. तसेच आगामी ‘द बॅटल ऑफ यारमुक’ या आगामी सौदी सिनेमाला संगीत देणार आहेत.

मोहम्मद बिन सलमानचे धाडसी निर्णय

सौदी अरेबियाचे राजपुत्र आणि अप्रत्यक्ष शासक मोहम्मद बिन सलमान यांनी त्या देशाची प्रतिमा बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. याअंतर्गत, सौदी अरेबियाने बंद सिनेमागृहे पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये पहिल्यांदा गैर मुस्लिम पर्यटकांचे स्वागत या देशाने केले. महिलांना गाडी चालविण्याची परवानगी दिली. अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या. वाळवंटात ५०० अब्ज डॉलरचा निओम शहर उभारण्याचा सौदीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या शहरात हरित हायड्रोजनचा मोठा प्लान्ट असणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०२६ मध्ये कार्यान्वित होणार आहे. यात दररोज सुमारे ६०० टन कार्बनमुक्त हायड्रोजन उत्पादित केला जाणार आहे. परिणामी वार्षिक ५० लाख टन कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन करण्याचे उद्दिष्ट आहे.

देशात अनेक रिसॉर्टही सुरू केले आहेत. पर्यटनासोबत सांस्कृतिक विश्वाला चालना देण्यासाठीही अनेक संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात सुरूवात झाली. क्रीडा प्रकारात आपल्या देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी अनेक खेळांचा प्रचार हा देश करत आहे. हेविवेट मुष्टियुद्ध, डब्ल्यूडब्ल्यूई, फुटबॉल लीग आदी क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या देशाचा सांस्कृतिक चेहरामोहरा बदलण्यासाठी सौदी अरेबियाने २०२३ मध्ये एक व्हिजन कार्यक्रम लाँच केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा राष्ट्रगीताच्या नव्या ढंगाचा प्रयोग करण्यात येत आहे.

सनातनी चेहरा लपवण्याचा प्रयत्न?

सौदी अरेबिया पश्चिम आशियातील एक सुन्नी मुस्लिम देश आहे. हेजाज आणि नज्द या राज्यांच्या एकीकरणातून १९३२ साली सौदी अरेबियाची निर्मिती झाली. चहूकडे वाळंवट. पश्चिमेला तांबडा समुद्र. पलिकडे इजिप्त. दक्षिणेला हिंदी महासागर आणि ओमान, येमेनसारखे देश. उत्तरेला इराक, जॉर्डनच्या सीमा आणि पूर्वेला कुवेत, यूएई. सौदीत इस्लामची सर्वाधिक पवित्र स्थळे आहेत. इस्लामचे संस्थापक मुहम्मद यांचा जन्म या देशात झाला होता. मक्का आणि मदिना सौदीत आहेत. १९३८ मध्ये देशात पेट्रोलियमचे साठे सापडले आणि तेव्हापासून सौदी अरेबिया जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक आणि निर्यात करणारा देश बनला.

सध्या २०१७ पासून मोहम्मद बिन सलमान सौदी अरेबियाचे अप्रत्यक्ष शासक आहेत. राजेशाही आणि धार्मिक कट्टरता ही या देशाची ओळख आहे. सर्व अर्थव्यवस्था केवळ आणि केवळ तेलाभोवती फिरते. हे चित्र २०३० पर्यंत बदलण्याचे देशाचे उद्दिष्ट आहे.  

टीकाही सुरू

मात्र दुसरीकडे सौदीच्या या प्रयत्नांवर टीकाही होत आहे. सौदी अरेबियाला आपला कधीही बदलता न येणारा रूढीवादी, सनातनी चेहरा लपवयाचा असल्याचे छुपे मनसुबे यामागे असल्याची टीका काही मानवी हक्क संस्थांनी केला आहे. महिलांना सौदीत अत्यंत मर्यादित अधिकार आहेत. येथे मुक्त भाषणांवर मर्यादा आहेत. त्यामुळे झिमर यांनी राष्ट्रगीत बदललं तरी राष्ट्र सनातनी परंपरेच्या जोखडातून बाहेर पडणार का, हा खरा प्रश्न आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why saudi arabia is changing its national anthem with the help of a hollywood composer print exp amy