माणसाच्या आसपास वावरणारे प्राणी संरक्षणासाठी माणसावरच निर्भर असतात. प्राणीप्रेमावर आश्वस्त असलेले हे प्राणी कधी कधी उपद्रवकारी ठरतात. अशाच कुत्र्यांचे जगणेच हिरावून घेण्याची एक क्रूर पद्धत काही वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने सुरू केली होती. ती बंद करण्याच्या मागणीसह गेली १९ वर्षे भटकी कुत्री आणि भरकटलेल्या प्राण्यांना जीवदान देण्याचे व्रत घेतलेल्या मुंबईतील मालाड पश्चिम येथील ‘अहिंसा’ या संस्थेची ही कहाणी..
गेल्या जुलै महिन्यात पुणे जिल्ह्य़ातील माळीण गावावर मृत्यूने तांडव घातले. शेकडो माणसे मृत्युमुखी पडली. अनेक जनावरेही दगावली. काही जनावरांनी संकटाची चाहूल लागताच सुटका करून घेतली आणि पळ
या दुर्घटनेनंतर संकटग्रस्तांच्या मदतीकरिता शेकडो हात तातडीने तेथे दाखल झाले होते. संकटातून बचावलेल्या, मालकाच्या मायेला पारखे झालेल्या आणि पोरकेपणानं लांब थांबलेल्या जनावरांनाही मदतीची गरज होती. संकटग्रस्त माणसांच्या मदतीकरिता सरसावलेल्या हातांपैकी काही हातांनी या मुक्या जिवांनाही सावरलं..
..या दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशीच, ३१ जुलैला दुपारी मी डॉ. गोपाळ रायते यांना फोन केला. मालाडच्या अहिंसा संस्थेत प्रमुख पशुवैद्य म्हणून सुरुवातीपासून सेवाभावाने काम करणाऱ्या डॉ. रायतेंनी बराच वेळ फोन घेतलाच नाही. अखेर रात्री उशिरा माझाच फोन वाजला. पलीकडे डॉ. रायते होते. ‘मी माळीणला आहे’.. डॉक्टरांनी पहिलंच वाक्य उच्चारलं आणि त्यांनी माझा फोन का घेतला नसेल, याची मला जाणीव झाली. माळीणची दुर्घटना घडल्याबरोबर उपचाराची सारी साधने सोबत घेऊन ते तातडीने माळीणला दाखल झाले होते..
..‘अहिंसा’च्या कामाबाबत माहिती हवी असल्याचे सांगून मी त्यांना ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाची माहिती दिली आणि डॉ. रायतेंचा आवाज आणखी मृदू झाला.
‘अहिंसाचं काम या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचलं, तर खूप चांगलं होईल’.. ते समाधानानं म्हणाले. ‘मदत उभी राहो वा न राहो, पण अहिंसाबद्दल माहिती झाली, तर रस्त्यावर उपचाराअभावी तडफडणारं एखादं जनावर निदान आमच्यापर्यंत आणून तरी सोडलं जाईल. जीवदानाचं काम तरी नक्कीच उभं राहील’..डॉ. रायते यांचे हे शब्द माझ्या मनात रुतून राहिले आणि माळीणहून परतल्यानंतर नक्की भेटायचं असं ठरलं..
चार दिवसांनंतर पुन्हा एका सकाळीच डॉ. रायतेंचा फोन वाजला. भेटीचा दिवस ठरला आणि मालाडच्या लिंक रोडवरील अिहसा मार्गावर एका बाजूला असलेल्या अहिंसाच्या शुश्रूषा केंद्रात ठरलेल्या दिवशी मी दाखल झालो.
महापालिकेच्या कोंडवाडय़ाच्या जागेत, एका बाजूला अहिंसाचं हे केंद्र आहे. कधी काळी इथे डम्पिंग ग्राऊंड होतं. अजूनही एका बाजूला, कठडय़ापलीकडे कचरापट्टी आहेच.
‘याच ठिकाणी मुंबई महापालिकेचा ‘कत्तल’खाना होता’.. अहिंसाच्या त्या शुश्रूषा केंद्रात सहज आजूबाजूला नजर फिरवत असतानाच डॉ. रायते बोलून गेले आणि मी त्यांच्याकडे बघितलं. त्यांनी दिलेली माहिती ऐकून मी क्षणभर गोठून गेलो.
‘इथे एक चेंबर होतं. खोल खड्डय़ात तांब्याचा पत्रा होता, त्यात विद्युतप्रवाह सोडलेला. कुत्री घेऊन पालिकेची गाडी इथे यायची आणि त्या कुत्र्यांना खड्डय़ात ढकललं जायचं. एकच क्षीण किंकाळी ऐकू यायची’.. डॉ. रायते पुढे बोललेच नाहीत.
मी आजूबाजूला पाहिलं. वेगवेगळ्या पिंजऱ्यांमध्ये जखमी अवस्थेत ठेवलेली कुत्री-मांजरं, डॉ. रायतेंचा आवाज ऐकून कुईकुई करू लागली होती. डॉक्टर एका पिंजऱ्यापाशी जाऊन थांबले.. मीही मागोमाग जाऊन तेथे उभा राहिलो.
त्या जखमी कुत्र्याच्या डोळ्यात अपार प्रेम दाटलं होतं. डॉक्टरांनी पिंजऱ्याचं दार उघडलं आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला. मग डॉक्टरांनी मला माहिती देण्यास सुरुवात केली.
..एका पिंजऱ्याजवळ आम्ही थांबलो. एक दांडगा कुत्रा जखमी अवस्थेत, केविलवाण्या नजरेनं डॉक्टरांकडे पाहात होता. बहुधा उठण्याचं त्राण त्याच्या अंगात नव्हतं.
‘बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानाजवळच्या एका वस्तीतला हा कुत्रा.. एका रात्री बिबटय़ानं त्याच्यावर हल्ला केला. तो खूप जखमी झाला होता. नंतर काही स्थानिकांनी त्याला इथे आणून सोडलं. सतरा टाके घालून त्याची जखम शिवली. तो जगलाय.. आता तब्येत सुधारली की पुन्हा त्याला त्याच्या वस्तीत नेऊन सोडायचंय’.. त्याच्या कपाळावर हात फिरवत डॉक्टर बोलत होते.
..एका पिंजऱ्यात, एक गोंडस, बोलक्या डोळ्यांचं, पॉमेरियन शांतपणे पहुडलं होतं. पुढे एका पिंजऱ्यात एक टोळीच पहुडलेली होती. काही आडदांड, काही हडकुळी.. सारे एकत्र..
‘ही सगळी आंधळी आहेत.. त्यांना आता बाहेर सोडता येणारच नाही. पुन्हा रस्त्यावर गेली तर अपघातात सापडतील.. म्हणून आम्ही त्यांना अखेपर्यंत सांभाळणार’.. डॉक्टर म्हणाले.
अशीच काही मांजरंही आपापल्या पिंजऱ्यात अंगाचं वेटोळं करून शांतपणे पहुडली होती. अहिंसाच्या या केंद्रात जवळपास तीनशे पिंजरे आहेत. त्यापैकी अडीचशे पिंजऱ्यांत कुत्री-मांजरं पहुडलेलीच होती.
काहींना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच पकडून आणून सोडलं होतं. प्रत्येक पिंजऱ्याबाहेर त्या प्राण्याची माहिती देणारा तक्ता.. कुठून आणलं, काय झालंय, उपचार काय सुरू आहेत वगैरे..
काही कुत्र्यांची निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया झालेली. त्यांना काही दिवसांत पुन्हा त्यांच्या त्यांच्या वस्तीत सोडायचं असतं. दुसरीकडे सोडलं, तर नवख्या वस्तीत ती रुळत नाहीत, शिवाय तेथील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात कधी कधी जीवही गमावतात.. म्हणून त्यांना पुन्हा सुरक्षित सोडायचं कामही संस्थेचेच कर्मचारी करतात. पुढे काही दिवस, त्या त्या भागात जाऊन येतात. सोडलेलं ते कुत्रं, तिथे नीट रुळलंय याची खात्री करून घेण्यासाठी!
बोलत बोलत आम्ही एका खोलीशी थांबलो. तिथे मोठमोठय़ा भांडय़ांमध्ये भात शिजत होता. एका भांडय़ात डाळ शिजत होती.
माझ्या मनात उमटलेला एक प्रश्न मी त्यांना विचारण्यासाठी राखून ठेवला.
हाती असलेल्या निधीतून दररोज अडीचशे-तीनशे प्राण्यांचं खाणंपिणं, १७ कर्मचारी आणि तीन पशुवैद्यकांचं मानधन, इमारत देखभाल असा खर्च धरला, तर महिन्याकाठी तीन ते साडेतीन लाख रुपये उभे करावेच लागतात. केंद्राच्या ओपीडीमध्ये बाहेरचे प्राणी उपचारासाठी येतात. त्यांच्याकडून नाममात्र फी आकारली जाते. कधी कधी शस्त्रक्रियाही केल्या जातात. ज्यांना पैसे देणं परवडतं, त्यांच्याकडून हजार-पाचशे रुपये घेतो, पण प्राणी जगवणं महत्त्वाचं.. त्यामुळे पैशासाठी आम्ही कुणाला परत पाठवत नाही.. पालिकेकडून जवळपास ४० लाख रुपये मिळायला हवेत. पण’.. डॉक्टरांनी बोलणं अर्धवटच थांबवलं.
माणसापेक्षाही, इथं येणारे प्राणी नशीबवान असावेत, असं मला उगीचच वाटून गेलं.
अनेकदा भटकी कुत्री अपघातात किंवा आजाराने मरून पडतात. अशा वेळी आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात. अशी खबर मिळाली की संस्थेचे कार्यकर्ते तेथे जाऊन त्यांची विल्हेवाट लावतात.
पालिकेने निर्बीजीकरणासाठी आणून सोडलेल्या एका कुत्र्यामागे साडेतीनशे रुपये द्यावेत असा न्यायालयाचा आदेश आहे. त्याचे आजवरचे जवळपास ४० लाख रुपये मिळालेले नाहीतच पण शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारांचा खर्चही अहिंसाच करते. अशा प्रत्येक कुत्र्यामागे जवळपास बाराशे रुपये खर्च येतो, पण निधीअभावी सेवा थांबवायची नाही, असा अहिंसाचा निर्धार आहे.
अहिंसाच्या छपराखाली आलेल्या काही कुत्र्या-मांजरांना आता घराचं, माणसांच्या मायेचं छप्परही मिळालंय. अनेक प्राणीप्रेमी या संस्थेच्या कार्यात दाखल झाले आहेत. वय विसरून प्राणीप्रेमापोटी दररोज इथे भेट देणाऱ्या अंधेरीच्या वृद्ध महिलेची कहाणी सांगताना, संस्थेचे अध्यक्ष प्रफुलभाई शहा यांच्या डोळ्यात पाणी जमलं होतं. केंद्राचा फेरफटका मारून आम्ही पुन्हा डॉक्टरांच्या केबिनकडे यायला निघालो, तेव्हा दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. अहिंसाच्या कायमस्वरूपी रहिवाशांची पंगत अंगणात बसली होती. काही कुत्री, काही मांजरं घोळका करून एकत्र बसली होती..
आणि पंगत सुरू झाली. सहजीवनाचं एक आगळं चित्र अहिंसाच्या अंगणात उमटलं होतं.
अहिंसा , मुंबई
अहिंसाचे कार्यकर्ते केवळ या केंद्रातच उपचार करतात असे नाही. कुठे एखादा जखमी अवस्थेतला प्राणी पडल्याची खबर मिळाली, की ते गाडी करून तिकडे धाव घेतात. जागेवर उपचार करतात. तेवढं पुरेसं नसेल, तर त्याला घेऊन येतात आणि नवं जीवन देऊन पुन्हा त्याला त्याच्या वस्तीत सोडतात. काही प्राणी अहिंसाच्या केंद्रात समाधानानं अखेरचा श्वास घेतात.. रस्त्यावरच्या प्राण्यांना अहिंसा नावाचं एक छप्पर मिळालंय. केंद्रातील ओपीडीमध्ये महिन्याकाठी रस्त्यावरची जवळपास ५०० कुत्री उपचारार्थ आणली जातात.
‘अहिंसाच्या या शुश्रूषा केंद्रात आज जवळपास अडीचशे कुत्री-मांजरं आहेत. त्यापैकी काही आंधळी, काही कॅन्सरग्रस्त, तर काही लुळीपांगळी आहेत. त्यांना आता त्यांची वस्ती नाही. कधी तरी, कुणी तरी रात्री-बेरात्री त्यांना ‘अहिंसा’च्या दरवाजाशी आणून बांधलेलं असतं. मग त्यांचं मूळ सापडत नाही. त्यापैकी काही पाळीवही आहेत. पण मालकाला कंटाळा येतो, वय झालेल्या कुत्र्यांची देखभाल नकोशी होते आणि घरात, मायेच्या उबेत वाढलेला तो जीवही कुणीतरी गुपचूप इथे आणून सोडतो.. मग आम्ही त्याला सांभाळतो. शेवटचा श्वास घेईपर्यंत आम्हीच त्याला जपणार, त्याची देखभाल करणार’.. एकेका पिंजऱ्यासमोरून जाताना डॉक्टर बोलत होते आणि पिंजऱ्यातली सारी कुत्री कान टवकारून आमच्याकडे पाहात होती.
‘हे आमचं किचन’..
‘इथल्या अडीचशे कुत्र्यांसाठी आम्ही दररोज ताजं, शाकाहारी जेवण बनवतो. सकाळी दूध-बिस्किटाचा नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी लापशी-पेडिग्री आणि रात्री पुन्हा जेवण.. असा मोठा पसारा या किचनमध्ये आहे.’
संस्थेपर्यंत कसे जाल?
पश्चिम रेल्वेवरील मालाड स्थानकावर उतरल्यानंतर पश्चिमेला जायचे. काचपाडा परिसरात मूव्हीटाइम या मल्टिप्लेक्सनजीक ‘अहिंसा’ या संस्थेचे कार्यालय आहे.
धनादेश या नावाने काढावेत
अहिंसा
Ahimsa
( कलम ८० जी अन्वये देणग्यांना प्राप्तिकर सवलत)
संग्रहित लेख, दिनांक 5th Sep 2014 रोजी प्रकाशित
‘अहिंसाव्रतीं’चा जीवदानयज्ञ!
माणसाच्या आसपास वावरणारे प्राणी संरक्षणासाठी माणसावरच निर्भर असतात. प्राणीप्रेमावर आश्वस्त असलेले हे प्राणी कधी कधी उपद्रवकारी ठरतात.
First published on: 05-09-2014 at 02:13 IST
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ahimsa organization works for animals health