Ganesh Chaturthi 2025 Wishes: महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा २७ ऑगस्ट २०२५ (बुधवार) रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे.

या विशेष दिवशी प्रथम देवता श्रीगणेशाची मनोभावे पूजा केली जाते. तसेच शक्ती, बुद्धी, समृद्धी संपत्ती यांच्या या देवतेला वंदन करीत सर्व संकटांपासून मुक्ती मिळो, अशी कामना केली जाते आणि आर्थिक प्रगतीसाठी आशीर्वाद घेतले जातात. भक्त गणपती बाप्पाची घरी वा सार्वजनिक मंडळाच्या मंडपात मोठ्या श्रद्धेने प्राणप्रतिष्ठापना करीत विधिवत पूजा-अर्चा करतात. अशा या गणेश चतुर्थीच्या मंगलमय दिनानिमित्त तुम्ही तुमच्या नातेवाइक, मित्रमंडळी व प्रियजनांना खास मराठीतून WhatsApp, Facebook, Instagram, Messages च्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही निवडक शुभेच्छा घेऊन आलो आहोत.

गणेश चतुर्थी २०२५ साठी मराठमोळ्या शुभेच्छा (Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi)

१) उंदरावर बैसोनी आली गणेशाची स्वारी
त्याच्या येण्याने अवघी सृष्टी चैतन्यमय झाली!
भक्त मंडळी फुलांचा वर्षाव करती,
बाप्पाच्या येण्याने आनंदाला आली भरती!
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

२) मोदकांचा प्रसाद केला,
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटूनी तयार झाले,
वाजत-गाजत बाप्पा आले
गुलाल फुले, अक्षता उधळे,
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे
गणेश चतुर्थीनिमित्त खूप खूप शुभेच्छा!

३) गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया!
बाप्पा तुम्हाला सदबुद्धी, कीर्ती अन् अखंड यश देवो!

४) श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली
सज्ज व्हा फुले उधळायला गणाधीशाची स्वारी आली
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

५) तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!

६) तूच माझी आई देवा, तूच माझा पिता
तूच माझी शक्ती अन् तूच भाग्यविधाता!
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!

७) आज अवघा संसार शरण आला तुला
चंद्र, सूर्यही स्वागतास सज्ज झाले!
आले आले उंदरावर स्वार होऊनी
माझे गजराजे आले!
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

८) तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता
विघ्न विनाशक मोरया
संकटी रक्षी शरण तुला मी
गणपती बाप्पा मोरया!

९) हार फुलांचा घेऊनी, वाहू चला हो गणपतीला,
आद्य दैवत साऱ्या जगाचे, पूजन करूया गणरायाचे,
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!!

१०) बाप्पा आला माझ्या दारी, शोभा आली घरी
संकट घे देवा तू सामावून, आशीर्वाद दे भरभरूनी,
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!!