अठरा वर्षांचा मुलगा महाविद्यालयात जातो म्हणून घराबाहेर पडतो आणि घरी परत येतच नाही.. एक मध्यमवयीन गृहस्थ घरातील लहानशा भांडणाचा राग मनात घेऊन घराबाहेर पडतात, त्यांचा पुढे काहीही पत्ता लागत नाही.. घराजवळच खेळत असलेला एक चिमुकला घरी परतत नाही, आई-वडिलांना त्याचा काही शोधही लागत नाही.. सारे काही सुरळीत चालले असताना अचानक बेपत्ता झालेले असे अनेक जण आणि प्रियजनांच्या आठवणींनी व्याकूळ झालेले त्यांचे कुटुंबीय..
या कुटुंबीयांची त्यांच्या हरवलेल्या नातेवाइकांशी भेट घालून देण्याचा लहानसा पण मोलाचा प्रयत्न विजय टॉकीजसमोरील ‘श्री गजानन मंडळा’ने आपल्या देखाव्याद्वारे केला आहे. सजावटीवर खर्च न करता या मंडळाने ‘तेरा बच्चा, मेरा बच्चा’ या सामाजिक संस्थेकडून शहरातील विविध भागांतून बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती व छायाचित्रे घेऊन ती मंडपात फ्लेक्सच्या स्वरूपात लावली आहेत. हरवलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांचा संपर्क क्रमांक, हरवल्याची तक्रार कोणत्या पोलिस ठाण्यात दाखल आहे ही माहितीही देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यांतील एका बेपत्ता व्यक्तीस पाहिलेल्या नागरिकाने मंडळाकडे संपर्क साधला आहे. त्यामुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आशेचा एक किरण दिसला आहे.
मंडळाचे कार्यकर्ते देवेंद्र जैन आणि अध्यक्ष राकेश गाडे यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली. जैन म्हणाले, ‘हरवलेल्या व्यक्तींची छायाचित्रे दिसल्यावर गणपती पाहायला आलेले नागरिक आवर्जून थांबून माहिती वाचतात. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून इतरही बेपत्ता व्यक्तींचे कुटुंबीय स्वत: माहिती आणून देऊन ती प्रदर्शित करण्याबाबत विनंती करत आहेत. या वर्षी मंडळाने जाहिराती प्रदर्शित न करता प्रोजेक्टरच्या साहाय्याने मोठय़ा पडद्यावर हरवलेल्या व्यक्तींसंबंधीची माहिती दाखवण्यास सुरुवात केली आहे.’
उत्सवाच्या पहिल्या दिवशी मंडळाने बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या हस्तेच गणपतीची आरती केली. शेवटच्या दिवशी निघणाऱ्या मिरवणुकीतही हे कुटुंबीय आपल्या बेपत्ता नातेवाइकांच्या नावाचा फ्लेक्स बोर्ड हातात घेऊन सहभागी होणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 12th Sep 2013 रोजी प्रकाशित
बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाइकांना देखाव्याद्वारे आशेचा किरण
हरवलेल्या नातेवाइकांशी भेट घालून देण्याचा लहानसा पण मोलाचा प्रयत्न विजय टॉकीजसमोरील ‘श्री गजानन मंडळा’ने आपल्या देखाव्याद्वारे केला आहे. सजावटीवर खर्च न करता या मंडळाने ‘तेरा बच्चा, मेरा बच्चा’ या सामाजिक संस्थेकडून शहरातील विविध भागांतून बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती व छायाचित्रे घेऊन ती मंडपात फ्लेक्सच्या स्वरूपात लावली आहेत.

First published on: 12-09-2013 at 02:46 IST
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०१३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hopes of missing relatives by ganpati decoration