कावीळ आपणास अनोळखी नाही. डोळ्यांमधील पांढरा भाग पिवळा होणे, त्वचा पिवळसर
दिसणे आणि लघवी गडद पिवळी होणे ही काविळीची लक्षणेही आपल्याला माहिती असतात. मुळात कावीळ हा काही आजार नव्हे, ते एक लक्षणच आहे. कारण ते आपल्याला जाणवते, दिसून येते. कावीळ होण्याची कारणे अनेक आहेत. त्यांचा परिणाम यकृताच्या कार्यपद्धतीवर होत असतो. यात सर्वात महत्त्वाचे व नेहमी दिसून येणारे कारण म्हणजे यकृतावर झालेला विषाणूंचा हल्ला. त्याला वैद्यकीय भाषेत ‘हिपेटायटीस’ असे संबोधतात तर मराठीत त्याला ‘यकृतदाह’ असे म्हणतात.
विषाणू कोणकोणते?
आतापर्यंत हिपेटायसीस या आजाराला कारणीभूत होणारे सहा प्रकारचे विषाणू शोधण्यात आले आहेत. त्यांचे वर्गीकरण ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’, ‘इ’ आणि ‘जी’ असे करण्यात आले. यापैकी ए व इ हे विषाणू मुख्यत: दुषित अन्न व पाण्यावाटे पसरतात. एकदा संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसून येण्यासाठी साधारणत: ४ ते ६ आठवडय़ांचा कालावधी जातो. त्यानंतर जी लक्षणे दिसून येतात त्यात कावीळ होण्याबरोबरच मळमळ, उलटी, ताप येणे, अंगदुखी, पोटात दुखण्याबरोबरच जुलाब  आणि सांधेदुखीही होऊ शकते. तसे पाहता हिपेटायटीसचे सर्वच विषाणू कमी अधिक प्रमाणात सारखीच लक्षणे दर्शवतात. परंतु मुख्य फरक त्यांच्या प्रसार पद्धतीत, संसर्ग झाल्यापासून लक्षणे दिसून येण्यापर्यंतच्या कालावधीत आणि भविष्यात होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांमध्ये दिसून येतो. हिपेटायटीस बी, सी व डी हे विषाणू प्रामुख्याने दूषित रक्तसंपर्कातून पसरतात. असुरक्षित यौनसंबंध, दूषित सुयांचा पुनर्वापर, बाधित रुग्णाचे शारीरिक द्रव पदार्थ- जसे लाळ, वीर्य, योनिद्रव, मणक्यातील पाणी, पोटातील पाणी यांच्या संपर्कातून, रुग्णाचे दाढीचे ब्लेड किंवा टूथब्रश शेअर केल्यानेसुद्धा हे विषाणू निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतात. संसर्ग झाल्यानंतर साधारणपणे ६ ते ८ महिन्यांनंतर लक्षणे दिसून येतात. हिपेटायटीस डी च्या विषाणू संसर्गासाठी व्यक्तीला आधी हिपेटायटीस बी विषाणूची बाधा होणे गरजेचे असते. कारण हिपेटायटिस डीच्या विषाणूला स्वत:ची पेशीभित्तिका नसते ती हा विषाणू हिपेटायटीस बीच्या विषाणूपासून घेतो. हिपेटायटीस जी हा तसा नवीनच विषाणू आहे. त्याच्यावरील संशोधन अजून सुरू आहे. त्याचे हिपेटायटीस संदर्भातील अस्तित्व सिद्ध करण्यास जरी संशोधकांना यश आले असले तरी त्याबद्दलची इतर माहिती अजून बाल्यावस्थेत आहे.
तसे पाहता हिपेटायटीस ए व इ हे विषाणू रुग्णाच्या शरीरात दीर्घकालीन वास्तव्य न करता काही कालावधीतच निघून जातात. त्यामुळे रुग्णाला त्यांच्या दीर्घकालीन दुष्परिणामांना सामोरे जावे लागत नाही. त्याउलट बी, सी व डी हे विषाणू रुग्णाच्या शरीरात दीर्घकालीन वास्तव्य करून हळूहळू त्याचे यकृत पोखरण्याचे कारस्थान सुरू ठेवतात. याची परिणती शेवटी यकृत निकामी होण्यात किंवा यकृताचा कर्करोग होण्यात होऊ शकते. म्हणूनच या विषाणूंचा संसर्ग काळजीचे कारण ठरतो.
असा पसरला हिपेटायटिस
इतिहासात जरा डोकावून पाहिले तर काविळीचे अस्तित्व फार प्राचीन काळापासून असल्याचे दिसते. जगभरात विविध भाषांत, विविध उपचारपद्धतींत त्याचे वर्णन करून ठेवले आहे. इ. स. पूर्व पाचव्या शतकात हिप्पोक्रेटीस या ग्रीक तत्त्ववेत्त्याने त्याबद्दल लिहून ठेवले आहे. कावीळ इतका प्राचीन आजार असला तरी त्याचे प्रमुख कारण सूक्ष्मजीव असू शकतात हे विसाव्या शतकापर्यंत माहित नव्हते. तसेच त्याचे संक्रमण रक्ताद्वारे होऊ शकते याचीही कल्पना नव्हती. १८८५ मध्ये लर्मन नावाच्या एका जर्मन संशोधकाने रक्तसंक्रमणामुळे कावीळ होऊ शकते हे सर्वप्रथम सिद्ध केले. त्या काळी देवीच्या रोगावर एडवर्ड जेन्नरने शोधलेली लसिका निरोगी लोकांना टोचण्याचे काम जोमात सुरू होते. त्यावेळी जर्मनीतील ब्रेमेन शहरात देवीचा उद्रेक झाला. त्याला प्रतिबंध म्हणून गावकऱ्यांना या लसीची मात्रा टोचण्यात आली. गावकऱ्यांसोबत तेथील जहाज बांधणी कारखान्यातील कामगारांनाही तीच लस देण्यात आली. या लसीकरणामुळे देवीच्या रोगाला तर आळा तर बसला, परंतु काही महिन्यातच तेथील काही कामगारांना काविळीची लक्षणे दिसून यायला सुरुवात झाली. या गोष्टीची इत्थंभूत माहिती लर्मनने नोंदवून ठेवली आहे. काही कालावधीतच त्याला असे १९१ कावीळीचे रुग्ण आढळून आले. या काविळीचा स्रोत शोधला असता त्याला असे लक्षात आले की ज्या कामगारांना काविळीची बाधा झाली आहे त्या सर्व कामगारांना एकाच लॉट मधील लसिका देण्यात आली. यातून काढलेल्या निष्कर्षांत त्याने दाखवून दिले की ज्या व्यक्तीकडून ही लस मिळवण्यात आली त्या व्यक्तीमुळेच हा रोग इतर कामगारात पसरला आहे. लर्मनने त्या काळी केलेले हे संशोधन आजही रोगपरिस्थिती विज्ञानातील उत्कृष्ट उदाहरण म्हणून ओळखले जाते. त्यानंतरच्या काळात देखील असे बरेच उद्रेक दिसून आले. १९०९-१० मध्ये ‘साल्वार्सन’ नावाचे एक इंजेक्शन उपलब्ध झाले. ते ‘सिफिलीस’ या गुप्तरोगाच्या एका प्रकारावरील उपचार म्हणून थोडय़ाच काळात प्रसिद्धीस आले. परंतु ते देतानाही सुईचा पुनर्वापर मोठय़ा प्रमाणात झाला. कारण सुईच्या पुनर्वापरामुळे रोगप्रसार होऊ शकेल हे कुणाच्या ध्यानीमनीदेखील नव्हते. त्यामुळे अनेकांना हिपेटायटीसची लागण झाली. पुढे पहिल्या महायुद्धाच्या काळात अनेक सैनिकांत दूषित रक्तसंक्रमणामुळे या विषाणूचा प्रसार झाला. जैविक युद्धासाठी प्रसिद्ध असलेल्या दुसऱ्या महायुद्धात पिवळा ज्वर आणि गोवरच्या लसीकरण कार्यक्रमात दूषित लसीकरणाने असंख्य सैनिकांना हिपेटायटिसच्या विषाणूचे पदकही गळ्यात पाडून घ्यावे लागले. अशा रीतीने हा विषाणू सर्वदूर पसरला.
असे शोधले गेले हिपेटायटिसचे विषाणू
हिपेटायटीस हा आजार सर्वश्रुत झाला होता. तरी त्याचे नेमके कारण सिद्ध होत नव्हते. हिपेटायटीसच्या संशोधनात खरा बदल दिसून आला तो १९६७ साली बरुच ब्लुमबर्ग या अमेरिकन संशोधकाच्या महत्वपूर्ण योगदानाने. ऑस्ट्रेलियातील आदिवासी जमातीतील लोकांच्या रक्तामधील घटकांवर संशोधन करत असताना ब्लुमबर्ग ला एक नवीनच सूक्ष्मकण दिसून आला. या सूक्ष्मकणाला त्याने ‘ऑस्ट्रेलिअन अँन्टीजेन’ असे नाव दिले. पुढील तपासात हा ऑस्ट्रेलिअन अँन्टीजेन दुसरा तिसरा कुणी नसून हिपेटायटीस ‘बी’च्या विषाणूचाच एक भाग असल्याचे सिद्ध झाले. हाच कण आजच्या हिपेटायटीस बी विषाणूच्या निदान प्रक्रियेत शोधला जातो. या कणावरील संशोधन, हिपेटायटीस बीवरील लस निर्मितीतील योगदान तसेच ‘कुरु’ या अफलातून रोगावरील संशोधनासाठी ब्लुमबर्ग यांना १९७६ साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९७० साली डी. एस. डेन या शास्त्रज्ञाने हिपेटायटीस बीचा संपूर्ण विषाणू शोधून काढण्यात यश मिळवले. म्हणून या विषाणूला ‘डेन पार्टीकल’ असेही म्हटले जाते. त्यानंतर गेल्या दोन ते तीन दशकांत हिपेटायटीस ‘ए’, ‘सी’, ‘डी’, ‘इ’ आणि ‘जी’ हे विषाणू शोधण्यात यश मिळाले.
हिपेटायटिस विषाणूंचा म्होरक्या- बिपेटायटिस बी!
हिपेटायटीस सहा प्रकारच्या विषाणूंमुळे होत असला तरी त्यांचा म्होरक्या म्हणून वैद्यकीय क्षेत्रात हिपेटायटीस बी चांगलाच ओळखला जातो. परंतु सामान्य जनमानसात दुर्दैवाने त्याची ओळख अजून ठसलेली नाही. आपण एच.आय.व्ही.बद्दल जागरूक आहोत. कारण चहुबाजूंनी त्याविषयीची माहिती आपल्याला मिळत असते. ते खरे तर योग्यच आहे, पण त्याच्याबरोबर त्याच्यासारख्याच पसरणाऱ्या हिपेटायटीस बीच्या विषाणूबद्दल आपणास काडीमात्र कल्पना असू नये ही खेदाची बाब आहे. तसे पाहता हिपेटायटीस बीचा विषाणू एच.आय.व्हीच्या विषाणूपेक्षा ५० ते १०० पट अधिक जलद गतीने संक्रमित होतो. उदा. दूषित सुई टोचल्यास एच.आय.व्ही.चा विषाणू संक्रमित होण्याची शक्यता ०.३ टक्के इतकी असते तर तीच शक्यता हिपेटायटीस बीच्या बाबतीत ३० टक्के इतकी असते. एवढेच नव्हे तर एच.आय.व्ही.चा विषाणू बाहेरच्या वातावरणात जास्तीत जास्त २ ते ३ तासच टिकू शकतो. परंतु एखाद्या कोरडय़ा झालेल्या रक्ताच्या थेंबात हिपेटायटीस बीचा विषाणू सात दिवसांपर्यंतही जिवंत राहू शकतो आणि संक्रमितसुद्धा होऊ शकतो. इतके गुणविशेष असतानादेखील हिपेटायटीस आजाराबद्दल अनभिज्ञता, रोगनिदानाकडे दुर्लक्ष आणि उपचाराबद्दल अनास्था या तीन बाजूंनी समाजाला एका घातक त्रिकोणात बंदिस्त केल्याचे दिसते.
हिपेटायटिसची बाधा झालीच तर?
आज तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीच्या जोरावर हिपेटायटीससाठी अचूक निदान चाचणी उपलब्ध आहे. ही चाचणी रक्ताच्या नमुन्यावर करण्यात येते व त्याचा अहवाल एका दिवसात मिळतो. तसेच रक्ताच्या एकाच नमुन्यावर हिपेटायटीस बी व सी या दोन्ही विषाणूंची चाचणी करता येते. चाचणीच्या अहवालात आपणास विषाणूची बाधा झाली असेल तरी घाबरून जाण्याचे कारण नसते. तसेच अशा व्यक्तीला लगेच उपचारांची गरज असेलच असेही नाही. जर पहिल्यांदाच संसर्ग झाला असेल आणि रुग्णाला तीव्र लक्षणे दिसून येत असतील तर त्याच्यावर लक्षणांनुसार उपचार करून योग्य आहाराचा सल्ला दिला जातो. साधारणत: सहा महिन्यांत १० पैकी ९ रुग्ण पूर्णपणे बरे होतात. तसेच एकदा या संसर्गातून बरे झाल्यावर आयुष्यभर पुन्हा संसर्गाची शक्यता नसते. परंतु जर हा विषाणू सहा महिन्यानंतरदेखील रक्तात आढळून आला तर तो दीर्घकालीन वास्तव्य निर्देशित करतो. अशा वेळी रुग्णास आधुनिक उपचारपद्धतीने विषाणूविरोधी औषधे दिली जातात. ही औषधे विषाणूंचा पूर्ण नाश जरी करू शकली नाहीत तरी ती त्यांचा शरीरातील प्रसार आणि भविष्यातील दुष्परिणाम कमी करण्यास मदत करतात. त्यानंतरही काही रुग्ण थोडय़ाच वर्षांत विषाणूमुक्त होऊ शकतात तर काही आजन्म विषाणूग्रस्त राहू शकतात. अशा व्यक्तींना आयुष्यभर विषाणूविरोधी औषधे घेण्यासोबतच योग्य आहार, व्यसन मुक्तता तसेच आपल्यापासून इतरांना या विषाणूची बाधा होऊ न देण्याची काळजी घेणे गरजेचे ठरते.
हिपेटायटिसपासून सुरक्षित कसे राहता येईल?
ज्यांना विषाणूची बाधा झालेली नाही अशा व्यक्तींनी भविष्यात सुरक्षितता म्हणून हिपेटायटीस बीसाठी उपलब्ध असलेली लस घेणे नेहमीच फायद्याचे ठरते. ह्य़ा लसीची पहिली मात्रा घेतल्यानंतर दुसरी मात्रा एक महिन्याने व तिसरी मात्रा सहा महिन्यांनी घ्यावी लागते. आजपर्यंतच्या सर्वेक्षणानुसार ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे निदर्शनास आले आहे. तिचे दुष्परिणामही दिसून आलेले नाहीत. या लशीतून हिपेटायटीस डीपासूनच्या सुरक्षिततेचा वाढीव बोनसही मिळतो! आता ही लस नवजात अर्भकांसाठीदेखील उपलब्ध आहे. हिपेटायटीस एसाठीची लसही उपलब्ध असली तरी भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये जवळजवळ सर्वानाच हा विषाणू बालपणीच गाठतो. त्यामुळे तिचा फारसा उपयोग होत नाही. अशी लस हिपेटायटीस सी या विषाणूसाठी उपलब्ध नसली तरी एकटय़ा हिपेटायटीस बी पासूनच्या संरक्षणाने पुढील महत्त्वाचे दुष्परिणाम टाळता येतात. कारण एकटय़ा हिपेटायटीस बीचा संसर्ग हा हिपेटायटीस सी विषाणूपेक्षा जास्त घातक आणि दीर्घकालीन ठरतो.
गांधीजींची तीन माकडे आणि हिपेटायटिस!
जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार आतापर्यंत जगातील २ अब्ज लोक हिपेटायटीस या आजाराने बाधित झाले आहेत. जगातली प्रत्येक बारावी व्यक्ती या विषाणूने बाधित होत असते. दरवर्षी ६ लाख लोक या रोगाच्या गंभीर दुष्परिणामामुळे मृत्यूमुखी पडतात. हिपेटायटीसच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत आपला देश मधल्या श्रेणीतला देश म्हणून ओळखला जातो. आपल्याकडे २ ते ७ टक्के लोक दरवर्षी या विषाणूने बाधित होतात. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने २८ जुलै हा दिवस ‘जागतिक हिपेटायटीस दिन’ म्हणून घोषित केला आहे. हा दिवस ब्लुमबर्ग यांचा जन्मदिवस आहे.
या निमित्ताने हिपेटायटिसबाबतच्या माहितीचा प्रसार करणे म्हणजे ब्लुमबर्ग यांच्या योगदानाचा योग्य सन्मान करणे असेच म्हणावे लागेल. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने एक नवीन आणि काहीशी मजेदार क्लृप्ती शोधून काढली आहे. त्यानुसार एका गिनीज रेकॉर्डमध्ये सहभागी होण्याची संधीही तुम्हा-आम्हापर्यंत चालून आली आहे. या रेकॉर्डसाठी गरज आहे कमीत कमी पंचवीस लोकांनी एकत्र येऊन ‘वाईट ऐकू नका’, ‘वाईट बोलू नका’ आणि ‘वाईट बघू नका’ असे एकसाथ इशारे करण्याची! जेणे करून जगभरातील शासनव्यवस्थांनी हिपेटायटीससंदर्भात गांधीजींच्या तीन माकडांसारखी जी भूमिका घेतली आहे तीत बदल होईल, आणि ते हिपेटायटीसचा प्रसार थांबवण्यासाठी प्रभावी उपायांची अंमलबजावणी करतील. याविषयीची विस्तृत माहिती http://www.worldhepatitisalliance.org /WorldHepatitisDay/WHD2013/Guinness.asp या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आता गरज आहे ती आपल्या प्रतिसादाची!
(लेखक अहमदनगर येथील ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन वैद्यकीय महाविद्यालया’त सूक्ष्मजीवशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)