अमेरिकेतील एक बालिका नुकतीच एचआयव्हीमुक्त झाली आहे. तिला जन्मत:च एचआयव्ही संसर्ग होता पण उपचारानंतर ती खडखडीत बरी झाली आहे. आता तिला भविष्यात एचआयव्हीविरोधी औषधांची गरज भासणार नाही. मिसिसिपी येथे जन्मलेल्या चिमुकलीला जन्मत:च एचआयव्हीचा संसर्ग झाला होता. त्याची कुठलीही लक्षणे दिसत नव्हती. जन्मानंतरच्या चाचण्यात तिला एचआयव्ही लागण असल्याचे निष्पन्न होताच काही तासातच तिला औषधोपचार सुरू करण्यात आले, आता ती अडीच वर्षांची असून तिला एचआयव्हीची कुठलीही बाधा नाही.एचआयव्हीबाधितांसाठी हा मोठा आशेचा किरण असला तरी प्रौढांमध्ये औषधे इतक्या झटपट प्रतिसाद देत नाहीत. बाल्टीमोर येथील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या विषाणूशास्त्रज्ञ डा. देबोरा पेरसॉद यांच्या मते बालकांमध्ये एचआयव्ही संसर्ग बरा करणे शक्य आहे हे सिद्ध झाले आहे. २००७ मध्ये टिमोथी रे ब्राऊन ही एचआयव्ही संसर्गातून बरी झालेली पहिली व्यक्ती होती.त्याचा हा संसर्ग रक्ताच्या कर्करोगावरील औषधांनी बरा झाला हे खरे असले तरी त्यावेळी एचआयव्ही संसर्गाला प्रतिरोध करणारे जनुकीय उत्परिवर्तन असलेल्या एका दात्याकडून घेतलेल्या मूलपेशींचे प्रत्यारोपणही त्या व्यक्तीत केले होते . आताच्या घडामोडीत सदर बालिकेवर एचआयव्ही विरोधी औषधांनी उपचार करण्यात आले होते. त्यात अँटीरेट्रोव्हायरल औषधांचे कॉकटेल वापरले होते.बालकांमध्ये एचआयव्ही उपचारांसाठी ते नेहमीच वापरले जाते. ती बालिका एचआयव्ही मुक्त झाली याचा अर्थ असा की, तिच्यातील एचआयव्ही विषाणू हे पेशींमध्ये लपण्याच्या आतच त्यांच्यावर या औषधांनी योग्यवेळात हल्ला चढवला व त्यामुळे ही औषधे लागू पडली. एचआयव्हीचा विषाणू पेशींमध्ये खोलवर जाऊन लपला की, मग तो कुठल्याच उपचारांना दाद देत नाही. या मुलीचा जन्म एका ग्रामीण रूग्णालयात झाला व तिला एचआयव्हीची लागण असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले होते. तेथील बालरोग व एचआयव्ही तज्ञ डॉ. हॅना गे यांनी त्या बालिकेला एचआयव्ही विरोधातील तीन औषधांचे कॉकटेल जन्मानंतर अवघ्या तीस तासात सुरू केले. त्यानंतर तिला जॅकसन येथे मिसिसिपी विद्यापीठाच्या मेडिकल सेंटरमध्ये हलवले होते.नंतर अठरा महिने तिच्यावर उपचार चालू होते. नंतर पाच महिन्यांनी आई व ती बालिका तपासणीसाठी आले असता त्या बालिकेत एचआयव्हीचा संसर्ग उरलेला नव्हता हे चाचण्यात सिद्ध झाले. सहा प्रयोगशाळांनी या बालिकेची तपासणी करून तिच्यात एचआयव्हीचा विषाणू नावालाही शिल्लक राहिला नसल्याचा निर्वाळा दिला आहे. आई बाळाला जे स्तनपान देत असते त्यामुळेही एचआयव्हीवरील उपचारांना बाळ जास्त प्रतिसाद देते त्यामुळे नवजात बालकांवरील एचआयव्ही उपचार व प्रौढांमध्ये केले जाणारे उपचार यात मिळणाऱ्या निष्कर्षांत फरक आहे. एचआयव्हीची लागण झाली म्हणजे माणूस लगेच मरतो अशी समजूत आहे ती तितकीशी बरोबर नाही. एचआयव्ही संसर्ग असलेले लोक बराच काळ जिवंत राहतात. त्यांची प्रतिकारशक्ती विषाणूशी कशी झुंज देते यावर ते अवलंबून असते. प्रतिकारशक्ती जर वेगाने कमकुवत झाली तर ते अनेक रोगांना बळी पडतात. विसाव्या शतकात आफ्रिकेत प्रथम एड्सचा उदय झाला. १९८० पर्यंत तो एक गंभीर समस्या बनला व जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार तीस वर्षांत अडीच कोटी लोकांनी या विषाणूससंर्गामुळे जगाचा निरोप घेतला आहे
पालेभाज्यांमुळे आतडय़ांचे संरक्षण
झोपी गेलेला जागा झाला