‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) दिलेल्या आणि राज्यातील सरकारी व चार खासगी महाविद्यालयांतील सर्व प्रकारच्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राज्य कोटय़ातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने सुरू केले आहे.
आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, ओटी, फिजिओथेरपी, बीएएसएलपी, बीपीओ आणि नर्सिग या इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेशही नीटमधूनच केले जाणार आहेत. याशिवाय चार खासगी महाविद्यालयांचे प्रवेशही केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे नीटमधून केले जातील. या सर्व अभ्यासक्रमांच्या मिळून तब्बल पाच हजार जागांपैकी १५ टक्केअखिल भारतीय स्तरावरील कोटा वगळता उर्वरित प्रवेश नीटमधून प्रवेश पात्र ठरलेल्या राज्यातील ३३,९६४ विद्यार्थ्यांमधून केले जातील.
संचालनालयाच्या http://www.dmer.org  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपली माहिती भरायची आहे. या माहितीच्या आधारे राज्याच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या राज्य कोटय़ातील प्रवेशासाठी गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना १२ ते २० जूनदरम्यान संचालनालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवडय़ात विद्यार्थ्यांचे कौन्सिलिंग, कागदपत्रांची पडताळणी, प्रवेशासाठी प्रेफरन्स भरणे आदी प्रक्रिया पार पडतील.
राज्यातील वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी केंद्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या नीट-पीजीच्या वेळेसही संचालनालयाने विद्यार्थ्यांकडून स्वतंत्रपणे माहिती मागविली होती. ‘नीट-पीजीसाठी ‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन’ने तयार केलेली गुणवत्ता यादी राज्यातील प्रवेशासाठी जशीच्या तशी वापरता येणे शक्य नाही. कारण, राखीव कोटय़ातील एनटी१, एनटी२ हे प्रवर्ग त्यांच्या गुणवत्ता यादीत गृहीत धरण्यात आले नव्हते, म्हणून आम्ही विद्यार्थ्यांकडमून स्वतंत्रपणे माहिती मागवून गुणवत्ता यादी तयार केली,’ असे वैद्यकीय संचालक प्रवीण शिनगारे यांनी सांगितले. हा अनुभव गाठीशी असल्याने संचालनालयाने पदवीच्या प्रवेशांसाठीही नीट-यूजीच्या विद्यार्थ्यांकडून माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे.
हाच खटाटोप अभियांत्रिकीच्या अखिल भारतीय कोटय़ासाठी जेईई-मेनमधून जागा भरताना तंत्रशिक्षण संचालनालयाला करावा लागणार आहे. त्याआधी हा कोटा एआयईईईमधून भरला जात असे. त्या वेळी एआयईईईची विद्यार्थ्यांच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जात असे. परंतु या वर्षी सीबीएसईने विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केलेली नाही. त्यामुळे आम्हाला विद्यार्थ्यांकडून जेईई-मेन्सचे गुण आणि तत्सम माहिती मागवून गुणवत्ता यादी तयार करावी लागेल, असे तंत्रशिक्षण संचालक सु. का. महाजन यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संचालनालयाच्या http://www.dmer.org  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपली माहिती भरायची आहे. या माहितीच्या आधारे राज्याच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या राज्य कोटय़ातील प्रवेशासाठी गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना १२ ते २० जूनदरम्यान संचालनालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे.

जुलैच्या पहिल्या आठवडय़ात विद्यार्थ्यांचे कौन्सिलिंग, कागदपत्रांची पडताळणी, प्रवेशासाठी प्रेफरन्स भरणे आदी प्रक्रिया पार पडतील.

मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medical admission from state quota process started