X

ऊसतोडणी कामगारांचा  दरवाढीसाठी आंदोलनाचा इशारा

राज्यातील ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरवाढीचा त्रिपक्षीय करार करावा, अन्यथा १ ऑक्टोबरपासून संप सुरू करण्यात येईल.

राज्यातील ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरवाढीचा त्रिपक्षीय करार करावा, अन्यथा १ ऑक्टोबरपासून संप सुरू करण्यात येईल. कोल्हापूर जिल्ह्य़ातील ऊसतोडणी व वाहतूक कामगार या संपाची तयारी साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या आबासाहेब चौगुले यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

या कामगारांच्या विविध मागण्या आणि संपासारखे आंदोलन करावे लागण्याची कारणे या बाबीतील सविस्तर निवेदन मुख्यमंत्री, कामगारमंत्री तसेच साखर आयुक्त व कामगार आयुक्त आणि राज्य सहकारी संघ यांना पाठविण्यात आले आहे. यामध्ये ऊसतोडणी व वाहतुकीची दरवाढ, राज्य शासनाने घोषित केलेल्या माथाडी बोर्डाची अंमलबजावणी व भविष्य निर्वाह निधी लागू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी . विमा योजना लागू करा, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

चौगुले म्हणाले, ऑक्टोबर २०१५ मध्ये झालेल्या कराराची तीन वर्षे गेल्या हंगामात पूर्ण झाली असल्याने आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी चर्चा करून नवीन त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्याची मागणी संघटनेने केले आहे. त्याची राज्य सरकार व राज्य साखर संघाने पूर्तता केली नाही तर राज्यातील सर्व ऊसतोडणी व वाहतूक कामगार मुकादम संप करणार आहेत. करार झाल्याशिवाय हातात कोयता घेणार नाही. या संपाबरोबरच सप्टेंबर महिन्यात कारखाना व विभागीय पातळीवरील मेळावेही घेण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला दिनकर आदमापुरे, विलास दिंडे, सदाशिव ताईशेटे, शिवाजी कुराडे, पांडुरंग मगदूम उपस्थित होते.