ज्येष्ठ साहित्यिका शांता शेळके यांच्या साहित्यिक आणि जीवनप्रवासाने रसिक भारावून गेले. निमित्त होते अक्षर दालन आणि निर्धार यांच्या वतीने आयोजित ‘अक्षरगप्पा’ कार्यक्रमाचे. अक्षर दालन येथे आयोजित या उपक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
पुणे येथील सखी प्रॉडक्शन्स प्रस्तुत या ‘शांतास्मरण’ कार्यक्रमामध्ये शांता शेळके यांच्या कविता, गाणी आणि आत्मकथन यावर आधारित सादरीकरण करण्यात आले. सुमारे दोन तासांच्या या कार्यक्रमाने रसिकांना खिळवून ठेवले. आपला काव्यप्रवास उलगडताना शांताबाईंनी सांगितलेल्या आठवणी, साध्या आणि सोप्या भाषेत लिहिण्याचा चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी कोल्हापुरात दिलेला सल्ला, हृदयनाथांसह लता मंगेशकर यांच्या आठवणी सांगत अनेक बहारदार गीतांचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. या वेळी अनेक गाण्यांनी वन्स मोअरही घेतला.
मानसी आपटे आणि अपर्णा कुलकर्णी यांच्या काव्यवाचनाला तर कीर्ती वैद्य, ओंकार देशमुख यांच्या गायनाला रसिकांनी टाळय़ांच्या गजरात दाद दिली. संतोष कुळकर्णी, तुषार दीक्षित, प्रसाद वैद्य यांनी सुंदर अशी वाद्यसाथ केली. रसिकांच्या वतीने या वेळी प्रा. मानसी दिवेकर आणि कवी अशोक भोईटे यांनी मनोगत व्यक्त केले. रवींद्र जोशी यांनी स्वागत केले, तर समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.