गोकुळ दूध संघात सत्तांतर झाले, तरी वार्षिक सर्वसाधारण सभेतील वादाची परंपरा सुरूच राहिली. सोमवारी झालेल्या सभेत सत्तारूढ आणि विरोधकात विरोधी गटात मोठी घोषणाबाजी रंगली. या जुगलबंदीमध्येच सुमारे सव्वा तास सभेचे कामकाज सुरू होते. विरोधी गटाने समाधानकारक उत्तरे देत नसल्याचा आरोप करीत सभास्थळ सोडले. त्यानंतर सभेचे कामकाज सुरळीत पार पडले.
गेल्या पंधरवड्यापासून गोकुळची वार्षिक सभा गाजत आहे. यामुळे आज सभेपूर्वीच तणावपूर्ण वातावरण वातावरण होते. विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांच्या समवेत काही सभासद आले होते. त्यांनी सुरुवातीपासून उपस्थित प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्यावीत, अशी मागणी चालू केली. तर पूर्णवेळ सभा चालवू; तुमच्याप्रमाणे गुंडाळली जाणार नाही, असे सत्ताधारी गटाने प्रत्युत्तर दिले.कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी विषय वाचन केले. लेखी आलेल्या प्रश्नाची उत्तरे संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी देतानाच गोकुळने वर्षभरात केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. गोकुळचा विकास आणि विस्तार दूध घटकांचे हित हे आमच्या कामकाजाचे सूत्र आहे, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना ठणकावले.
सभेत गोंधळ
महाडिक यांनी प्रश्नांची उत्तरे न देता पळवाट काढली जात असल्याचा आरोप केला. यातून सत्तारूढ आणि विरोधी गटात घोषणाबाजी सुरू झाल्याने सभेत गोंधळ उडाला. एकीकडे अध्यक्ष पाटील यांचे भाषण आणि दुसरीकडे विरोधकांची घोषणाबाजी अशा वातावरणात सभेचे कामकाज तासभर सुरू राहिले. समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याचा आरोप करून महाडिक यांनी सभास्थळ सोडले. त्यांनी बाहेर येऊन समांतर सभा घेऊन त्यांनी सत्तारूढ गटावर टीकेची तोफ डागली.
नेते सभासदांत
यापूर्वी गोकुळच्या सभेवेळी नेते सभा मंचावर उपस्थित राहून सभेचे सूत्रे हाताळत असत. या वेळी सतेज पाटील, हसन मुश्रीफ, ऋतुराज पाटील हे तिन्ही नेते सभासदांमध्ये बसले होते. याआधी सभा काही मिनिटांत गुंडळली जात होती. या वेळी ती सव्वा तासाहून अधिक काळ चालली. यातून नेतृत्वातील आणि सभा चालवण्यातील गुणात्मक फरक लक्षात यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
खासदार महाडिक अनुपस्थित
गोकुळ दूध संघाच्या कारभारावर खासदार धनंजय महाडिक यांनी जोरदार ताशेरे ओढले होते. सभेला उपस्थित राहून याचा जाब विचारणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. प्रत्यक्षात धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक या दोघांनीही सभेला दांडी मारल्याने विरोधाची धार कमी झाली. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शौमिका महाडिक, सत्यजित कदम यांनी आक्रमक विरोधकाची भूमिका एक हाती निभावली.