कडवेमध्ये आंतरराज्य कुस्ती स्पर्धा
कडवे येथील आंतरराज्य कुस्ती मदानात पंजाब केसरी मल्ल काका पंजाबीने हरियाणाचा महान भारत केसरी मल्ल छोटा सोनूवर निर्णायक गूण मिळवत विजय मिळवला. उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार विरुद्ध हरियाना केसरी सुनील चोटीवाला ही दोन नंबरची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
यंदाच्या हंगामातील शाहूवाडी तालुक्यातील हे शेवटचे कुस्ती मदान होते. त्यामुळे या मदानातील लढती पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी तोबा गर्दी केली होती.
श्री विठ्ठलाई देवी यात्रेनिमित्त यंदाही या आखाड्यावर आंतरराज्य कुस्ती मदान आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये प्रथम क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पंजाबीने छोटा सोनूवर निर्णायक मात केली. या कुस्तीला माजी मंत्री विनय कोरे यांनी सलामी दिली. दोन्ही मल्ल तुल्यबळ ताकदीचे असल्याने २५ मिनिटांच्या खडाजंगीनंतर मुख्य पंच राम सारंग यांनी कुस्ती शौकिनांच्या इच्छेखातर पहिला गुण मिळवणाऱ्या मल्लास विजयी घोषित करण्याचा निर्णय घेतला.
या वेळी २७ व्या मिनिटाला छोटा सोनूवर ताबा मिळवत पंजाबीने निर्णायक गुण मिळवून हे मल्ल युध्द जिंकले.
नंदू आबदार विरुद्ध सुनील चोटीवाला ही दोन नंबरची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. बलदंड ताकदीच्या नंदूला, अत्यंत चपळ असलेल्या सुनीलने पंचवीस मिनिटे झुंज देऊन अखेर विजयापासून रोखले. या कुस्ती लढतीनेही उपस्थित कुस्तीशौकीन बेहद्द खूश झाले. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत त्रिमूर्ती केसरी राजेंद्र राजमाने याने मोतीबागेच्या शिवाजी पाटील याला अवघ्या पाचव्या मिनिटाला आसमान दाखविले. राजाराम यमगर विरुद्धची चौथी लढत सोलापूरच्या अनिल फाटके याने एकलंगी डावावर जिंकली. तर अभिजित भोसले (कोल्हापूर) विरुद्ध बाबू भोसले (सोलापूर) यांच्यातील पाचवी लढत बरोबरीत सुटली.
ऑलम्पिकवीर बंडा पाटील-रेठरेकर, उपमहाराष्ट्र केसरी महिपती केसरे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त वसंत पाटील-सोनवडेकर या नामवंत मल्लांना घडविण्यासाठी कडवे गावच्या या आखाड्याचे फार मोठे योगदान आहे. या मदानाला शतकी परंपरा लाभली आहे. त्यामुळे या मदानावरील कुस्त्यांना विशेष महत्त्व आहे.