लक्ष लक्ष दीपांनी उजळून निघालेल्या करवीरनगरीत धनसंपन्नतेची देवता असलेल्या लक्ष्मीचे विधिवत पूजन बुधवारी करण्यात आले. व्यापारी बंधूंसह घरोघरी लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम धडाक्यात साजरा करण्यात आला. लक्ष्मीचा धनवर्षांव सदैव राहावा, अशी मनोभावे प्रार्थनाही करण्यात आली. दरम्यान, गुरुवारी पाडव्याच्या मुहूर्तावर होणारी खरेदी लक्षात घेऊन व्यापारी पेठा पुन्हा एकदा ग्राहक राजाच्या सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत.
काल नरकचतुर्दशी झाली. दिवाळीतील सर्वात मोठा धार्मिक विधी म्हणून लक्ष्मीपूजनाकडे पाहिले जाते. त्याची तयारी सकाळपासूनच सुरू होती. पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाली होती. केळीचे खांब, ऊस, पाने-फुले, श्रीफळ, प्रसादाचे साहित्य याची मोठय़ा प्रमाणात खरेदी झाली. सायंकाळी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवत पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले. करवीरनिवासिनी महालक्ष्मीचा आशीर्वाद असलेल्या या नगरीत दिवसेंदिवस प्रगती होत आहे. लक्ष्मीदेवतेचा वास कायम राहावा, तिचा आशीर्वाद लाभावा यासाठी लक्ष्मीपूजन केले गेले. लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. अनेक कुटुंबांनी पर्यावरणाचे भान ठेवत मोठय़ा आवाजाचे फटाके वाजवण्याचे टाळले.
दरम्यान, उद्या दिवाळी पाडवा आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल असतो. गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक साहित्य, सदनिका, वाहन, दागिने अशा प्रकारच्या खरेदीला महत्त्व दिले जाते. ग्राहकांनी आपल्याकडून खरेदी करावी यासाठी विक्रेत्यांनी सवलतीही जाहीर केल्या आहेत. ग्राहकांच्या प्रतीक्षेत बाजारपेठ सज्ज झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2015 रोजी प्रकाशित
करवीरनगरीत लक्ष्मीपूजन, फटाक्यांची आतषबाजी
लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी
Written by अपर्णा देगावकर

First published on: 12-11-2015 at 03:45 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laxmipujan celebrated with enthusiasm in kolhapur