व्यापाऱ्यांच्या जोखडातून शेतकऱ्यांना मुक्त करण्याच्यादृष्टीने शासनाने सुरु केलेला संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडी बाजाराची सुरुवात कोल्हपुरात २ सप्टेंबरला सासने मदानावर होणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या ५० अॅग्रो प्रोड्युसर कंपन्यांचे स्टॉल, बचत गटांचे खाद्य पदार्थाचे स्टॉल, शेतकऱ्यांचे स्टॉल यांचा समावेश असेल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे नुकतीच दिली. ‘लोकसत्ता’ने गेल्या पंधरवड्यापूर्वी कोल्हापुरात शेटकेची बाजार सुरु करण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते . त्यासाठी दहा प्रमुख स्थळांचा शोध सुरु झाल्याचे नमूद केले होते .
कोल्हापुरात संत शिरोमणी सावता माळी आठवडी बाजाराची सुरुवात करण्याच्या दृष्टीने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शासकीय विश्रामगृह येथे बठक घेतली. या वेळी महानगरपालिका आयुक्त पी.शिवशंकर, महानगरपालिका उप आयुक्त विजय खोराटे, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पणन उप व्यवस्थापक सुभाष घुले उपस्थित होते.
या वेळी मंत्री खोत म्हणाले, कायदे हे शेतकरी आणि ग्राहक या दोहोंच्या फायद्याचे असावेत. आज रस्त्याच्याकडेला कोठेही लोक भाजीपाला घेऊन बसलेले असतात. त्यांना शिस्त असली पाहिजे. उत्पादक आणि ग्राहक अशी बाजाराची साखळी तयार करण्याचे शासनाचे धोरण असून उत्पादकाला दोन पसे जादा मिळाले पाहिजेत. आज मार्केट कमिट्या अडती व व्यापाऱ्यांच्या हातात गेल्या असून उत्पादकांचा थेट मार्केटशी संबंध निर्माण झाला पाहिजे.
आत्माने विक्रीसाठी गट तयार करावेत. शासनाने आत्मांतर्गत प्रोड्युसर कंपन्यांना निधी उपलब्ध करुन दिला आहे, त्यांनी आपला माल थेट विक्रीसाठी बाजारात आणला पाहिजे. जे गट आठवडी बाजारांतर्गत विक्रीला येणार आहेत अशांना टेंट शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येतील. त्याची नोंद पणन आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांच्याकडे राहील, असेही खोत यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Aug 2016 रोजी प्रकाशित
कोल्हापुरात २ सप्टेंबरपासून आठवडी बाजाराची सुरुवात
पंधरवड्यापूर्वी कोल्हापुरात शेटकेची बाजार सुरु करण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते
Written by लोकसत्ता टीम

First published on: 28-08-2016 at 04:46 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Markets week start in kolhapur from september