हुपरी (हातकणंगले) येथील १४ वर्षीय मुलीवर शाळेत सोडण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याप्रकरणी रमजान महंमद घुडूभाई (रा. राजगुरुनगर हुपरी) याला दोषी ठरवत शुक्रवारी अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांनी दहा वष्रे सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची ३० हजारांची रक्कम पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
हुपरी येथे राहणारा रमजान घुडूभाई हा चांदी कारागीर आहे. १३ ऑगस्ट २०१३ रोजी घुडूभाई हा मारुती कारमधून कामावर जात असताना त्याने अल्पवयीन मुलीला शाळेत सोडण्याच्या बहाण्याने लिफ्ट दिली. मात्र, तिला शाळेत न सोडता कागल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये नेऊन कारमध्येच तिच्यावर बलात्कार केला. झाल्या प्रकाराबद्दल घरी सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत तिला रस्त्यावरच सोडून देऊन घुडूभाई पळून गेला होता. पीडित मुलीने घडला प्रकार आईस सांगितल्यानंतर घुडूभाई याच्या विरोधात हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर घटनेनंतर संतप्त जमावाने घुडूभाईच्या घरावर हल्ला करून प्रापंचिक साहित्यांचे नुकसान केले होते. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली. सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून रमजान घुडूभाई याला वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st May 2016 रोजी प्रकाशित
अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीस सक्तमजुरी
दंडाची ३० हजारांची रक्कम पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 21-05-2016 at 05:19 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor girl raped in kolhapur