भरमसाठ व्याजाने खासगी सावकाराकडून घेतलेल्या पशाचे व्याज न दिल्याने सावकारासह त्याच्या चौघा साथीदारांनी पेठवडगांव येथील व्यावसायिकाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. याबाबतची फिर्याद मुस्ताक कमालसाब बेपारी (वय ३८, रा. बेपारी गल्ली, पेठवडगांव, ता. हातकणंगले) यांनी वडगांव पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी राजवर्धन बाबासाहेब पाटील (वय २८), पप्पू उर्फ प्रविण संभाजी माने (वय २२), राकेश नवनाथ हाके (वय २२), विशाल उर्फ तात्या दिलीप जाधव (वय २८), रवी उर्फ बाळा चंद्रकांत धनवडे (वय २२, सर्व रा. पेठवडगांव ता. हातकणंगले) याना रात्री उशिरा ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.
मुस्ताक बेपारी यांनी जनावरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायातील आर्थिक अडचणीमुळे २०१४ साली राजवर्धन पाटील याच्याकडून मासिक १५ हजार रुपये व्याजाने ७५ हजार रुपये घेतले होते. ७५ हजारपकी ५० हजारांची रक्कम बेपारी याने दोन टप्प्यात परतफेड केली होती. पाटील याने महिन्याकाठी १५ हजार रुपये व्याज घेणे सुरूच ठेवले होते. पाटील याने बेपारीकडे व्याजाच्या रकमेसाठी वारंवार तगादा लावला होता.
गुरुवारी सकाळी पाटील याने प्रविण माने, राकेश हाके, विशाल जाधव, रवी धनवडे बेपारीला दुचाकीवर बसवून पिसे गल्लीमधील क्लबमध्ये नेऊन डांबून ठेवले. यानंतर सर्वानी बेपारीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
तासाभराने राजवर्धनने बेपारीच्या पत्नीशी संपर्क साधून व्याजाचे पसे दिल्याशिवाय तुझ्या नवऱ्याला सोडत नाही अशी धमकी दिली.
दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बेपारीच्या भावाने पशासाठी काही मुदत मागितली, मात्र अपहरणकर्त्यांनी मुदत देण्यास नकार देत बेपारीला पुन्हा मारहाण केली. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बेपारीची पत्नी व्याजाचे १४ हजार रुपये घेऊन गेल्यानंतर अपहरणकर्त्यांनी बेपारी याची सुटका केली. यानंतर बेपारीने वडगांव पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पाच जणांविरोधात फिर्याद दिली असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jul 2016 रोजी प्रकाशित
व्याजासाठी सावकाराकडून व्यावसायिकाचे अपहरण
पाटील याने बेपारीकडे व्याजाच्या रकमेसाठी वारंवार तगादा लावला होता.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 24-07-2016 at 01:02 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money lender kidnapped businessman for interest money