गोविंद पानसरे खुनाचा तपास अधिक वेगाने करता यावा याकरिता विशेष तपास पथकाने राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) सहकार्य घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी रविवारी हे पथक करवीरनगरीत दाखल होत असल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली. आतापर्यंत समीर गायकवाड वगळता अन्य कोणालाही अटक केलेली नाही. पाचजणांकडे चौकशी केली असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
पानसरे यांचा खून झाल्यानंतर सात महिन्यानंतर विशेष तपास पथकाने समीर गायकवाड या तरुणाला संशयित म्हणून अटक केली आहे. त्याच्याकडून खून प्रकरणाचे धागेदोरे उलगडण्याचा पथकाचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणेची मदत घेतली जात आहे. त्यातील पुढचे पाऊल म्हणून आता राष्ट्रीय तपास यंत्रणेची मदत घेतली जात आहे. हे पथक रविवारी कोल्हापुरात दाखल होणार आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र हे पथक किती जणांचे असणार, ते नेमके कोणत्या मुद्याचा तपास करणार याबाबतची माहिती सांगण्यात आली नाही. यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने गोवा राज्यातील मडगांव येथे झालेल्या बॉम्ब स्फोटाचा तपास करण्यासाठी भेट दिली होती.
पकडण्यात आलेल्या गायकवाड याच्या आवाजाची चाचणी घेण्याचे काम न्यायवैद्यक प्रयोगशाळेत सुरु आहे. तसेच त्याने केलेल्या मोबाईल कॉल्सचे विश्लेषण सुरु असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Sep 2015 रोजी प्रकाशित
पानसरे खुनाच्या तपासात मदतीसाठी एनआयएचे पथक आज कोल्हापुरात
गोविंद पानसरे खुनाचा तपास अधिक वेगाने करता यावा याकरिता विशेष तपास पथकाने राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) सहकार्य घेण्याचे ठरविले आहे.
Written by बबन मिंडे
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 20-09-2015 at 02:50 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nia squad in kolhapur for enquiry of govind pansare murder case