तिरुपती देवस्थानकडून महालक्ष्मीला दरवर्षी देण्यात येणारा शालू (महावस्त्र) बुधवारी देवीला मोठय़ा भक्तिभावाने अर्पण करण्यात आला. सकाळी १० वाजता सवाद्य मिरवणुकीने देवस्थान सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आला. यंदाचा शालू हा देवस्थान समितीकडून तिरुपतीची पत्नी म्हणून न स्वीकारता तो माता म्हणून स्वीकारण्यात आला असल्याचे देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे यांनी पत्रकारांना सांगितले.
बुधवारी सकाळी तिरुपती देवस्थान समितीचे सहायक अधिकारी आर. सेल्वम, के. वाणी यांनी हा शालू भवानी मंडप येथे आणला. या वेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून ढोल, ताशांच्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले. शालूच्या आगमनानंतर अंबाबाई मंदिराच्या परिसरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पोपटी रंग आणि गुलाबी पदर असलेल्या या शालूची किंमत ७४ हजार रुपये इतकी आहे. उद्या (गुरुवार) विजयादशमीच्या दिवशी पूजा झाल्यानंतर हा शालू अंबाबाईला नेसवण्यात येणार आहे. आठ दिवसांनंतर या शालूचा लिलाव करण्यात येणार आहे. अंबाबाईच्या चरणी पुणे येथील मनीष झेंडे यांनी सव्वातीन किलो चांदीच्या पादुका अर्पण केल्या आहेत.
या वेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, सदस्या संगीता खाडे, हिरोजी परब, प्रमोद पाटील, धनाजी जाधव उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Oct 2015 रोजी प्रकाशित
तिरुपती देवस्थानचा महालक्ष्मीला शालू
तिरुपती देवस्थानकडून महालक्ष्मीला मोठय़ा भक्तिभावाने शालू (महावस्त्र) अर्पण
Written by अपर्णा देगावकर

First published on: 22-10-2015 at 04:00 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sari given mahalaxmi from tirupati temple