सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेला पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल मंगळवारी आमदार चंद्रदीप नरके यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर खुला करण्यात आला. या प्रकारातून लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या निर्णयप्रक्रियेच्या पाठशिवणीचा खेळ सुरू झाल्याने वाहनधारकांची चांगलीच गोची झाली .

पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी, ५ जुल शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पावसाचा जोर आणि नदीचे वाढते पाणी यामुळे पूर आल्याने हा निर्णय कायम होता. गेले दोन दिवस पाणी ओसरू लागले असून पुराचा धोका जाणवेनासा झाला आहे. पण पूल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे नदीपलीकडील वडणगे, चिखलीपासून पन्हाळय़ापर्यंतच्या वाहनधारकांना त्रास होत आहे. त्यांना मोठा फेरफटका मारून शहरात यावे लागते.

ही बाब आमदार नरके यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी आज सकाळी पुलावर येऊन वाहनधारकांची कैफियत अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. अधिकारी नकार देत राहिले, पण नरके यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पूल दुचाकीसाठी खुला करण्यात आला.

नरके यांची पाठ वळताच प्रशासनाने पुन्हा पुलावरून होणारी वाहतूक बंद केली. नरके यांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी पुलावर धाव घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला. घेतलेला निर्णय का फिरवण्यात आला, असे विचारत प्रशासनाने लोकाभिमुख राहण्याची गरज व्यक्त केली. वरिष्ठ अधिकाऱ्याशी फोनाफोनी होऊन पुलावरील वाहतूक अखेरीस सुरू राहिली.