मोबाईल चोरीच्या कारणातून दोघा मित्रांनीच दगडाने मारहाण करुन एका तरुणाचा खून केल्याचे इचलकरंजी येथे शनिवारी  उघडकीस आले आहे. हैदर शहानूर कलावंत (वय २४ रा. गणेशनगर) असे मृताचे नांव आहे.

गणेशनगर येथे राहणारा हैदर कलावंत हा यंत्रमाग कामगार आहे. गणेश इंगळे व योगेश शिंदे हे त्याचे मित्र आहेत. तिघांनाही दारुचे व्यसन होते. हैदर याचा मोबाईल काही दिवसापूर्वी कामाच्या ठिकाणावरुन चोरीस गेला होता. एकाने तो चोरल्याचा हैदर याचा संशय होता. संबंधित युवकास मारहाण करण्यास हैदर याने गणेश व योगेश या दोघांना सांगितले होते.

ठरल्याप्रमाणे गणेश व योगेश यांनी हैदर याच्याकडे दारु व पैशाची मागणी केली. हैदर हा या दोघांसह दारु पिण्यासाठी एका मोकळ्या मैदानात जाऊन बसला होता. दारु पिल्यानतंर दोघांनी हैदर याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावरुन त्या तिघात वाद झाला. त्यातून चिडून पेव्हींग ब्लॉक, दगडाने योगेश व गणेश यांनी हैदर याच्यावर हल्ला केला. हैदर हा जखमी झाला. तो निपचित पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजून हैदर याला अन्यत्र ठिकाणी नेऊ न टाकण्यासाठी मोटरसायकलवर बसवले.

आरगे भवन परिसरातून ते तिघे जण कर्नाटकच्या दिशेने जाताना पोलिसाने त्यांना हटकले. मित्र जखमी असून त्याला रुग्णालयात नेण्यात येत असल्याचे सांगितले. तेथून पुढे ते जुना चंदूर रोड परिसरात गेल्यावर गृहरक्षक दलाचा जवान व काही नागरिकांनी त्यांना संशयावरुन अडवले. दोघांनाही पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जखमी हैदर याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. चौकशीत खुनाची घटना उघडकीस आली. गणेश व योगेश या दोघा संशयितांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघे संशयित अभिलेखावरील गुन्हेगार आहेत.