नजरचुकीने विषारी औषध प्राशन केल्याने प्रदीप प्रकाश नाईकनवरे (वय २६, रा. शाहूपुरी ६वी गल्ली) याचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री प्रदीप साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वडणगे (ता. करवीर) येथील फार्म हाऊसवर जेवण्यासाठी गेला होता. या वेळी ही घटना घडली. माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे व माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांचा तो मुलगा होय.
याबाबत अधिक माहिती अशी, की शुक्रवारी रात्री प्रदीप नाईकनवरे हा भाऊ स्वप्निल आणि काही मित्रांसमवेत वडणगे येथील त्यांच्या शेतातील घरामध्ये जेवणासाठी गेला होता. जेवण बनवून सर्व जण जेवायला बसणार होते. रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक प्रदीपला उलटय़ा होऊ लागल्याचे स्वप्निल आणि त्यांच्या मित्रांच्या निदर्शनास आले. नजीकच पडलेल्या कीटकनाशकाची बाटली पडली असल्याने प्रदीपने नजरचुकीने कीटकनाशक प्राशन केल्याचे लक्षात आहे. प्रदीपला तत्काळ कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. दोन दिवसांपासून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी पहाटे सहाच्या सुमारास प्रदीपचा मृत्यू झाला. तो इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमास होता. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली.