महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ १० एप्रिल रोजी संपला असून सात महिने उलटले तरी राज्य संघटनेच्या निवडणुकांबाबत कोणत्याही हालचाली होत नाहीत. त्यामुळे विदर्भातील काही जिल्हा संघटनांनी एकत्र येऊन या विरोधात राज्य सरकार, भारतीय बास्केटबॉल असोसिएशन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
विदर्भातील जिल्हा संघटना एकत्र आल्यानंतर राज्यातील बलाढय़ पुणे जिल्हा संघटनेने त्यांना पाठींबा दिला आहे. त्याचबरोबर रायगड, उस्मानाबाद, रत्नागिरी, नंदूरबार, मुंबई उपनगर अशा ३५ पैकी १८ जिल्हा संघटना त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या आहेत. नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव शत्रुघ्न गोखले व पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव तसेच महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे महासचिव ललित नहाटा हे गुरुवारी मुंबईत येणार असून राज्य संघटनेचे अध्यक्ष जयदेव श्रॉफ यांना घरी जाऊन याविषयीचे पत्र देणार आहेत.