इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पध्रेच्या बक्षीस वितरण सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय एफसी गोवा क्लबला चांगलाच महागात पडला असून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) त्यांना ५० लाखांचा दंड ठोठावला आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात अंतिम सामन्यात चेन्नईयन एफसीने ३-२ अशा फरकाने गोवाचा पराभव केला होता. त्यानंतर या सामन्याचा निकाल आधीच निश्चित असल्याचा आरोप करत गोवा क्लबने बक्षीस वितरण सोहळ्यावर बहिष्कार घातला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘एफसी गोवा क्लबला ५० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे आणि दहा दिवसांच्या आत त्यांनी तो भरणे क्रमप्राप्त  आहे,’’ असे एआयएफएअने आपल्या निवेदनातून स्पष्ट केले. एआयएफएफच्या शिस्तपालन कायद्याचे कलम ५३, ५८ आणि ६० अंतर्गत ही करवाई करण्यात आली आहे. तसेच गोवा क्लबचे साहित्य व्यवस्थापक राजेश मालगी यांना निलंबित करण्याचा निर्णयही शुक्रवारी झालेल्या शिस्तपालन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र चेन्नईयनचा प्रमुख खेळाडू एलानो ब्लूमरने गोवा क्लबचे सहमालक दत्तराज साळगावकर यांना शिवीगाळ केली होती आणि आयएसएलच्या अधिकाऱ्यांनी त्यावर कोणतीच कारवाई न केल्याने बक्षीस वितरण सोहळ्यावर बहिष्कार घालण्यास भाग पाडल्याचे गोवा क्लबकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 50 lakh fine to afc goa club