राष्ट्रकुल स्पध्रेतील सुवर्णपदक विजेता व ग्रँडमास्टर अभिजित गुप्ताने हुगेवीन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद राखताना ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेत सलग दोन वेळा विजेतेपद मिळविणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे.

गुप्ताने नऊ फेऱ्यांमध्ये साडेसात गुणांची कमाई केली. त्याचाच सहकारी संदीपन चंदाने उपविजेतेपद मिळविले. ग्रँडमास्टर एम.आर.ललितबाबू व ग्रँडमास्टर एम.शामसुंदर यांनी अनुक्रमे तिसरे व चौथे स्थान घेत भारताचे निर्विवाद वर्चस्व राखले. शेवटच्या फेरीत गुप्ताने नेदरलँड्सच्या लुकास व्हान फोरीस्टाला बरोबरीत रोखले. चंदाने ललितबाबू (६.५) याच्यावर शानदार विजय मिळविला. शेवटच्या फेरीअखेर त्याने सात गुणांची कमाई केली. शामसुंदरने भारताचीच खेळाडू ईशा करवडेला पराभूत केले. त्याचे साडेसहा गुण झाले. ईशाचे साडेपाच गुण झाले.

गुप्ताने या स्पर्धेतील सातव्या फेरीत मिगचिल देजोंग याच्यावर सनसनाटी विजय मिळविला़, तर सातव्या फेरीत सहकारी एस.नितीनला हरविले. त्याने आठव्या फेरीत संदीपन याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारली. या फेरीअखेर त्याने अन्य खेळाडूंपेक्षा अध्र्या गुणाची आघाडी घेतली होती. शेवटच्या फेरीत त्याला लुकासने चांगली लढत दिली. मात्र गुप्ताने संयमपूर्ण खेळ करीत हा डाव बरोबरीत ठेवीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

विजेतेपद मिळविण्यापेक्षाही ते टिकविणे आव्हानात्मक असते. हे लक्षात घेता ही कामगिरी स्वप्नवतच आहे. अजिंक्यपद राखण्यासाठी मी खूप तयारी केली होती. या तयारीमुळे हे विजेतेपद पुन्हा मिळवू शकलो.  अभिजित गुप्ता