भारताचा ग्रँडमास्टर बी.अधिबनने युक्रेनच्या युरियु कुझुबोव्हवर मात करत कतार मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत सनसनाटी विजय नोंदविला. अन्य लढतींत माजी विश्वविजेत्या व्लादिमीर क्रामनिक याने नेदरलँड्सच्या अनीष गिरी याच्यावर शानदार विजय मिळविला.
स्पर्धेतील पहिल्या फेरीत झालेल्या पराभवानंतर अधिबनने लागोपाठ पाच डाव जिंकले आहेत. त्याने किंग्ज इंडियन डिफेन्स तंत्राचा उपयोग करत हा डाव जिंकला.
क्रामनिकने गिरीला फियानचेतो तंत्राच्या साहाय्याने पराभूत केले. हा डाव जिंकून क्रामनिकने गिरी याच्याच साथीत संयुक्त आघाडीस्थान घेतले आहे. सालेम सालेह व युओ यांगयी यांनी प्रत्येकी साडेपाच गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. अधिबन याच्यासह तेरा खेळाडूंचे प्रत्येकी पाच गुण झाले आहेत.
भारताच्या पी.हरिकृष्णला रशियाच्या दानिल दुबोव्ह याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली. ग्रँडमास्टर अभिजित गुप्तालाही चीनच्या दिंग लिरेनविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवावा लागला. भारताच्या देवाशीष दासला स्पेनच्या इव्हान साल्गादो लोपेझने पराभवाचा धक्का दिला. नेदरलँड्सच्या रॉबिन व्हान काम्पेनने अरविंद चिदंबरमवर सहज मात केली. द्रोणावली हरिका हिला अर्मेनियाच्या हिरांत मेल्कुम्यानविरुद्ध पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्राचा खेळाडू समीर कठमाळे याला तुर्कस्तानच्या अलेक्झांडर इपातोव्ह याने हरविले. मेरी अ‍ॅन गोम्सने
अ‍ॅलेक्झांड्रा दिमित्रिजेव्हि हिच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारली.