Afghanistan Beat Pakistan by 18 Runs in T20I Tri series: आशिया चषकाच्या तयारीसाठी तिरंगी स्पर्धा खेळणाऱ्या पाकिस्तानला अफगाणिस्तानविरुध्द पराभवाला सामोरं जावं लागलं. शारजा इथे झालेल्या लढतीत अफगाणिस्तानने १८ धावांनी विजय मिळवत आशिया चषकासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. पाकिस्तानचा संघ १४ सप्टेंबरला आशिया चषकात भारताविरुद्ध खेळणार आहे.
पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि युएई यांच्यात टी-२० तिरंगी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पाकिस्तान संघाने जिंकले होते, परंतु तिसऱ्या सामन्यात त्यांना अफगाणिस्तानविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे आता आशिया चषकापूर्वी पाकिस्तान संघाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावांची मजल मारली. सेदिकुल्हा अटलने ४५ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ६४ धावांची खेळी केली. इब्राहिम झाद्रानने ४५ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह ६५ धावांची खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेली ८० चेंडूत ११३ धावांची भागीदारी निर्णायक ठरली. पाकिस्तानकडून फहीम अशरफने ४ विकेट्स पटकावल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानची सुरूवात खूपच खराब झाली आणि संघाने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. मुख्य फलंदाजांपैकी एकालाही मोठी खेळी करता आली नाही. दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या हारिस रौफने १६ चेंडूत ३४ धावा केल्या. १७० धावांचा पाठलाग करत असलेला पाकिस्तानचा संघ अवघ्या १५१ धावांत सर्वबाद झाला. अफगाणिस्तानकडून फझलक फरुकी, रशीद खान, मोहम्मद नबी आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.
इब्राहिम झाद्रानला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. सलामीच्या लढतीत पाकिस्तानने अफगाणिस्तानला नमवलं होतं. युएईविरुध्द पाकिस्तानने विजय मिळवला पण त्यांचा संघ ऑलआऊट झाला होता.