पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज अहमद शेहजाद उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला आहे. आयसीसीच्या उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक कायद्या अंतर्गत शेहजादवर सध्या ३ ते ६ महिन्यांच्या बंदीची शिक्षा होऊ शकते. २६ वर्षीय शेहजादने आतापर्यंत पाकिस्तानकडून १३ कसोटी, ८१ वन-डे आणि ५७ टी-२० सामने खेळले आहेत. सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची एक समिती शेहजादची चौकशी करणार असून यानंतर त्याच्या शिक्षेबद्दलचा निर्णय घेतला जाईल असं समजतंय.

प्राथमिक चाचणीमध्ये शेहजाद उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला आहे. मात्र त्याच्या शिक्षेबद्दल निर्णय घेण्यासाठी थोडा कालावधी लागू शकतो, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. फेब्रुवारी २०१६ मध्येही पाकिस्तानचा फिरकीपटू यासिर शहा उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला होता. यावेळी यासिरलाही निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं होतं.