संदीप कदम, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे आपले लक्ष्य असल्याचे बंगाल वॉरियर्सचा बचावपटू आदित्य शिंदे म्हणाला. सध्या सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगमध्ये आदित्य शिंदे डावा कोपरारक्षक तर, त्याचा भाऊ शुभम शिंदे उजवा कोपरारक्षक म्हणून खेळत आहे. सर्वच खेळाडूंचे देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न असते, तेच माझेही आहे. वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतही यंदा निवडीसाठी मी प्रयत्नशील आहे, असे आदित्यने सांगितले. भाऊ शुभम व आपल्या कबड्डी कारकीर्दीबाबत आदित्य म्हणाला,‘‘आम्ही लहानपणापासून आमच्या मोठया भावांना कबड्डी खेळताना पाहत होतो. त्यांना पाहून आम्हाला कबड्डी खेळण्याची प्रेरणा मिळाली व आम्हीही खेळण्यास सुरुवात केली. यानंतर कनिष्ठ व उपकनिष्ठ स्पर्धामध्ये आम्ही खेळायला लागलो. मग शुभमने कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला.

हेही वाचा >>> संजय सिंह यांना कुस्ती महासंघाची निवडणूक लढण्यापासून रोखण्याची विनंती! साक्षी मलिक, बजरंग पुनियाकडून क्रीडामंत्र्यांची भेट

शुभमला आधी प्रो कबड्डीत खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर मीही चांगली कामगिरी करत या लीगमध्ये दाखल झालो. आम्हाला घरच्यांचा नेहमीच पाठिंबा राहिला आहे. लहानपणापासून त्यांनी आम्हाला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले.’’ शिंदे बंधू चिपळूण तालुक्यातील खेळाडू आहेत. ते दोघेही वाघजई-कोळकेवाडी क्लबकडून खेळतात. प्रो कबड्डीत महाराष्ट्राच्या खेळाडूंबाबत आदित्य म्हणाला, ‘‘प्रो कबड्डीमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू चांगले आहेत. मात्र, युवा खेळाडूंना पाठिंबा दिल्यास लीगमध्ये खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंमध्ये आणखी भर पडेल. गादीवर (मॅट) प्रत्येकाला दुखापत होते. ते टाळण्यासाठी योग्य सराव करणे गरजेचे आहे. तसेच दुखापत झाल्यानंतरही त्यामधून लवकरात लवकरत कसे सावरता येईल, यासाठी खेळाडूंनी प्रयत्न केले पाहिजेत.’’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aim to represent country at the international level bengal warriors aditya shinde zws