दिएगो मॅराडोनाने विश्वविजेतेपदासह अर्जेटिनाच्या फुटबॉलमध्ये नवे पर्व रचले होते. क्लब तसेच अन्य स्पर्धामध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या लिओनेल मेस्सीलाही मॅराडोनाचा कित्ता गिरवायचा होता. त्यासाठी त्याने अथक प्रयत्नही केले. मात्र अर्जेटिनाला जेतेपद मिळवून देण्याचे त्याचे स्वप्न अधुरेच राहिले आणि मायदेशातील चाहते शोकसागरात बुडाले.
ब्युनॉस आयर्स शहरातल्या ओबेलिस्क परिसरात मोठय़ा स्पर्धाचे महत्त्वपूर्ण सामने भव्य पडद्यावर एकत्र पाहिले जातात. रविवारीही तसेच वातावरण होते, मात्र जर्मनीच्या विजयानंतर काही चाहत्यांचा संयम सुटला. काही चाहत्यांनी दगडफेक केली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. पराभवाने नाराज झालेल्या काही चाहत्यांनी खिडक्यांच्या काचा फोडल्या, दुकानांना आग लावण्याचाही प्रयत्न केला. या हिंसक चाहत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकारात १५ पोलीसही जखमी झाले असून, ४० जणांना अटक करण्यात आली आहे.
दुसरीकडे काही संयमी चाहत्यांनी अर्जेटिनाच्या वाटचालीचे कौतुक केले. ‘‘जर्मनी अव्वल संघ आहे. अर्जेटिनाने सर्वतोपरी प्रयत्न केले. संघाच्या कामगिरीचा अभिमान वाटतो,’’ अशा शब्दांत लिन्ड्रो पॅरेडिसने सांगितले. जेतेपदाच्या इतक्या समीप येऊनही यश न मिळाल्याने काही चाहत्यांना अश्रू आवरले नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Argentina riot police clash with fans after world cup loss