Argentina Won Copa America Final: लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा कोपा अमेरिकाचे विजेतेपद पटकावले आहे. कोलंबियाविरुद्धचा विजेतेपदाचा सामना निर्धारित वेळेत ०-० असा बरोबरीत होता. पहिल्या अतिरिक्त हाफमध्येही दोन्ही संघांना गोल करता आला नाही. पण ११२व्या मिनिटाला लुतारो मार्टिनेझने अर्जेंटिनासाठी गोल केला. या गोलनंतर ही आघाडी अर्जेंटिनाने शेवटपर्यंत कायम राहिली आणि मेस्सीचा संघ १-० असा विजय मिळवत चॅम्पियन ठरला. अर्जेंटिनाने १६व्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. २०२१ मध्ये, संघाने विजेतेपदाच्या सामन्यात ब्राझीलचा पराभव केला होता. तर मेस्सीच्या कारकिर्दीतील ही चौथी आंतरराष्ट्रीय ट्रॉफी आहे. हेही वाचा - Copa America: फायनलमध्ये लिओनेल मेस्सीच्या पायाला दुखापत, डगआऊटमधील रडतानाचा VIDEO व्हायरल कोपा अमेरिकाच्या फायनलमध्येच अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला दुखापत झाली. त्यामुळे मेस्सी संपूर्ण कोपा अमेरिका फायनल खेळू शकला नाही. सामन्याच्या उत्तरार्धात मेस्सीच्या पायाला दुखापत झाली. घोट्याच्या दुखापतीमुळे मेस्सीला ६६व्या मिनिटाला मैदान सोडावे लागले. त्याच्या उजव्या पायावर आईस पॅक होता. मैदानाबाहेर गेल्याने मेस्सी रडत होता, ज्याचा व्हीडिओ समोर आला आहे. आता त्याचा संघ विजेता ठरला आहे. जोवानी लो सेल्सोच्या पास वर मार्टिनेझने गोल केला. हेही वाचा - Euro Cup 2024 Final: स्पेनकडून इंग्लंडचा २-१ ने पराभव; चौथ्यांदा युरो कप जिंकणारा ठरला पहिलाच संघ Argentina ने विक्रमी १६व्यांदा जिंकले कोपा अमेरिकेचं जेतेपद आतापर्यंत कोपा अमेरिका स्पर्धेत एकाच संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले आणि ते म्हणजे अर्जेंटिना. हे विजेतेपद सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम अर्जेंटिनाने केला आहे. ही स्पर्धा १९१६ मध्ये पहिल्यांदा खेळली गेली, ज्याचे आयोजन अर्जेंटिनाने केले होते. उरुग्वे संघाने अंतिम फेरीत यजमान संघाचा पराभव करून पहिले विजेतेपद पटकावले. अर्जेंटिनाने १९२१ मध्ये पहिल्यांदा ही ट्रॉफी पटकावली होती आणि तेव्हापासून या संघाने एकूण १५ वेळा या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. हेही वाचा - Euro Cup 2024: स्पेनच्या १७ वर्षीय लामिने यामलने रचला इतिहास, दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचा ६६ वर्षे जुना विक्रम केला नावे लिओनेल मेस्सीच्या कारकिर्दीतील ही चौथी आंतरराष्ट्रीय ट्रॉफी आहे. २०२१ मध्ये, त्याने कोपा अमेरिकाचे जेतेपद पटकावत पहिली ट्रॉफी जिंकली. अर्जेंटिनाने २०२२ मध्ये युरो आणि कोपा अमेरिका विजेते यांच्यात होणारा आर्टेमियो फ्रँची चषकही जिंकला होता. त्याच वर्षी मेस्सीने पहिला फिफा विश्वचषक जिंकला. आता मेस्सीच्या खात्यात आणखी एक आंतरराष्ट्रीय ट्रॉफी आली आहे. कोपा अमेरिकेचा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वीच स्टेडियममध्ये गोंधळ उडाला होता. काही चाहते विना तिकीट सामना पाहण्यासाठी जबरदस्तीने स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना आढळले. सुरक्षा कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच प्रवेशद्वार बंद करण्यात आले. यानंतर तिकीट असलेल्यांनाही आत जाता येत नसल्याने मोठा गोंधळ झाला. मोठ्या कष्टाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आणि सामना ८२ मिनिटे उशिराने सुरू झाला.