गेले महिनाभर संपूर्ण जग फुटबॉलमय झालेले होते. अगदी छोटय़ा देशांपासून खंडप्राय देशांपर्यंत फुटबॉलचा ज्वर पसरला होता. दक्षिण अमेरिकेतल्या फुटबॉलचा समृद्ध वारसा असलेल्या अर्जेटिनाने लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली दिमाखदार खेळ करत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत जर्मनीने त्यांच्यावर मात केली आणि जगभरातले मेस्सी आणि अर्जेटिनाचे चाहते शोकसागरात बुडाले. पण फुटबॉल विश्वचषकाच्या आशा-निराशेच्या हिंदोळ्यापासून अर्जेटिनाच्या राष्ट्राध्यक्षा ख्रिस्टिना फर्नाडिझ मात्र अलिप्त राहिल्या आहेत.
‘‘मी फुटबॉलची चाहती नाही. मी विश्वचषकातला कोणताही सामना पाहिलेला नाही, अगदी अंतिम लढतही नाही,’’ असे त्यांनी प्रांजळपणे सांगितले.
एकीकडे जर्मनीच्या चॅन्सलर अँजेलो मर्केल जर्मनीच्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी अंतिम लढतीला स्वत: उपस्थित होत्या. जेतेपद पटकावल्यानंतर त्यांनी ड्रेसिंगरुममध्ये जाऊन खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांच्याबरोबर फोटोतही सहभागी झाल्या. मात्र जर्मनीचे प्रतिस्पर्धी असलेल्या अर्जेटिनाच्या संघाच्या नशिबी हे भाग्य नव्हते. संयोजकांनी फर्नाडिझ यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते मात्र घसा दुखणे या किरकोळ आजाराचे निमित्त सांगत त्यांनी उपस्थित राहणेही टाळले. देशभरात संघाला मिळणारा पाठिंबा आणि प्रेम टिपण्यात आणि समजून घेण्यात फर्नाडिझ कमी पडल्या अशी चर्चा जागतिक स्तरावर रंगली आहे.
अंतिम लढतीतील पराभवानंतर अर्जेटिनाचा संघ मायदेशी परतला. फुटबॉलपासून अलिप्त असलेल्या फर्नाडिझ यांनी संघाचे सांत्वन केले. अर्जेटिनाने चांगले प्रदर्शन केले. त्यामुळे त्यांनी प्रशिक्षक अलेजांड्रो साबेला यांचे दूरध्वनी करून अभिनंदन केले. जेतेपदाचा चषक अर्जेटिनाला मिळाला नसला तरी संघाने चाहत्यांची मने जिंकली आहेत, अशा शब्दांत फर्नाडिझ यांनी संघाचे कौतुक केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Argentine president miss wc final due to illness