टेनिसविश्वात स्वत:च्या नावाची ओळख असणाऱ्या आणि विविधांगी यश अनुभवलेल्या त्या दोघी संपृक्त स्थितीत एकत्र आल्या. त्यांना कोणालाही काही सिद्ध करून दाखवायचं नव्हतं. दोघींकडे असंख्य स्पर्धाचा, प्रवासाचा, प्रतिस्पध्र्याचा प्रचंड अनुभव होता. त्यांचं एकत्र खेळणं, दोघींच्याही कारकीर्दीसाठी जिंकणं बोनसच. आर्थिक विवंचना नव्हतीच. दोघींनाही गमावण्यासारखं काहीच नव्हतं, मात्र त्याच वेळी नावामागचा लौकिक जपण्याची जबाबदारी होती. दुखापतींनी दोघींनाही सातत्याने सतावलं होतं. मात्र एकत्र आल्यावर दुखापती दूर झाल्या आणि अद्भुत प्रवासाला सुरुवात झाली.
यंदाच्या वर्षांतच अमेरिकेतल्या इंडियन वेल्स स्पध्रेत संयोजकांनी महिला दुहेरीत ‘सानिया मिर्झा-मार्टनिा िहगिस’ अशा प्रवेशिकेची नोंद केली. ही जोडी यंदाचं वर्ष गाजवणार याची त्या दोघींनाही कल्पना नव्हती. दुहेरीत सहकारी बदलणं नित्याचंच. मार्टनिा ही सानियाची ७०वी सहकारी आहे आणि मार्टनिाच्या बाबतीतही हा आकडा कमी नाही. एकत्र खेळण्यापूर्वी त्यांची ओळख होती, मात्र आता त्या चांगल्या मत्रिणी झाल्या आहेत. दुहेरीमधलं यश सहकाऱ्याला समजून घेण्यातच आहे. नेटजवळून चापल्यपूर्ण आणि शैलीदार फटके मार्टनिाची खासियत, तर कोर्टच्या मागच्या बाजूने ताकदवान फोरहँड, स्मॅशेस लगावणं सानियाचे बलस्थान. उणं समजलं की प्रगतीचा मार्ग सुकर होतो असं म्हणतात, या दोघींनी तेच केलं आणि पुढे जे घडतं आहे ते इतिहासात आणि विक्रमपुस्तिकांत नोंदलं जातं आहे.
पंधराव्या वर्षी ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावत सगळ्यात कमी वयाची महिला ग्रँडस्लॅम विजेती होण्याचा विक्रम मार्टनिा िहगिसच्या नावावर आहे. ग्रँडस्लॅम स्पध्रेसाठी पात्र होण्याची वाट खडतर असते. ग्रँडस्लॅम स्पध्रेच्या जेतेपदासाठी आयुष्य खर्ची घालावे लागते. मार्टनिाने पोरसवदा वयात स्वप्नवत जेतेपद साकारले. सातत्यपूर्ण प्रदर्शनासह जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होणारी ती सगळ्यात कमी वयाची महिला टेनिसपटू ठरली. स्नायूंच्या दुखापतीमुळे अवघ्या २२व्या वर्षी निवृत्ती पत्करण्याच्या तिच्या निर्णयाने जगभरातल्या तिच्या चाहत्यांना धक्का बसला. चार वर्षांत बऱ्याच शस्त्रक्रिया आणि उपचारांच्या साथीने तिने स्वत:ला टेनिससाठी सिद्ध केलं. २००६ मध्ये तिने पुनरागमन केलं आणि जेतेपदांचा सपाटाच लावला. पुढच्याच वर्षी प्रतिबंधित उत्तेजकांच्या सेवनप्रकरणी ती दोषी आढळली. बंदीची शिक्षा आणि दुखापती यामुळे मार्टनिा विजनवासातच गेली. टेनिसच्या ओढीने उचल खाल्ली आणि पाच वर्षांनंतर, २०१३ मध्ये मार्टनिा पुन्हा खेळायला लागली. युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना त्यांच्या बरोबरीने ती दुहेरीत खेळू लागली. दीड वर्षांत संमिश्र कामगिरीनंतर मार्टनिासमोर सानिया मिर्झासह खेळण्याचा प्रस्ताव आला. सानियाला भेटताना मार्टनिाच्या नावावर टेनिसविश्वातली सगळी प्रमुख जेतेपदे, विक्रम, पुरस्कार होते. दोषी पादत्राणे तयार केल्याप्रकरणी मार्टनिाने प्रायोजकांवर ठोकलेला दावा गाजला होता. पाच प्रेमप्रकरणांनंतर मार्टनिाने एका नामांकित अश्वशर्यतपटूशी लग्न केले. मात्र तेही नातं टिकलं नाही. पाच भाषा बोलू शकणाऱ्या मार्टनिाची खेळातली आणि वैयक्तिक आयुष्यातली कारकीर्द रोलरकोस्टर राइडसारखी आहे.
एकंदर खेळाच्या विकासासाठी पूरक व्यवस्थेचा अभाव असणाऱ्या देशात राहून कारकीर्द घडवणारी सानिया निव्वळ अपवाद आहे. सानियाच्या प्रदीर्घ कालावधीत दोन गोष्टीत कमालीचं सातत्य होतं- दुखापती आणि वादविवाद. दोन्ही गोष्टी प्रगतीला मारक अशाच. दुखापती शारीरिकदृष्टय़ा खच्चीकरण करतात, तर वाद मानसिकदृष्टय़ा. तिने परिधान केलेल्या टीशर्टवरून निघालेला फतवा, भारतीय झेंडय़ासमोर पाय ठेवून बसल्याचे छायाचित्र, बीजिंग ऑलिम्पिकवेळी पोशाखसंहितेचं उल्लंघन, लंडन ऑलिम्पिकसाठी टेनिस संघाच्या निवडीवरून झालेला गदारोळ, पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकशी झालेले लग्न, पाकिस्तानची सून तेलंगण राज्याची सदिच्छा दूत कशी? या नियुक्तीवरून झालेली टीका, या आणि अशा असंख्य वादांमुळे सानिया चच्रेत राहिली. एकामागोमाग एक वाद उकरत असताना सानिया आंतरराष्ट्रीय खेळत होती. ती जिंकत होती, मात्र त्यात सातत्य नव्हतं. बॉलीवूड-ग्लॅमर आणि फॅशनविश्वात मनापासून रमणारी आणि समाजमाध्यमांवर लाखो फॉलोअर्स असणाऱ्या सानियाच्या खेळाची चर्चा बऱ्यापैकी मागे राहत असे. २००३ मध्ये सानियाने विम्बल्डन स्पध्रेत कनिष्ठ गटात दुहेरीचे जेतेपद पटकावले होते. त्या क्षणापासून यंदाच्या मार्च महिन्यात मार्टनिासह खेळण्याच्या निर्णयापर्यंतच्या एक तपाच्या कालावधीत टेनिसविश्वाचा मानिबदू असणारी पाच ग्रँडस्लॅम जेतेपदे सानियाच्या नावावर होती. डब्लूटीए स्पर्धाची ३२ जेतेपदे तिच्या नावावर होती. ऑलिम्पिक स्पध्रेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आफ्रो-आशियाई स्पध्रेत चार सुवर्ण, आशियाई क्रीडा स्पध्रेत आठ पदके, राष्ट्रकुल स्पध्रेत दोन पदके असा ऐवज सानियाच्या नावावर होता. दुखापतींची तीव्रता वाढल्याने तिच्या मनगटावर आणि गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही दुखणं कायम राहिल्याने कोरियाच्या स्पायरल पद्धतीद्वारे उपचार घ्यावे लागले. एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारांत मुशाफिरी करणाऱ्या सानियाला २०१३ मध्ये कठोर निर्णय घ्यावा लागला. दुखापतींचा ससेमिरा लक्षात घेऊन सानियाने एकेरी न खेळण्याचा निर्णय घेतला. शारीरिकदृष्टय़ा दमवणाऱ्या प्रकारातून घेतलेल्या सुज्ञ
माघारीच्या निर्णयाने दुहेरीच्या कारकीर्दीला नवसंजीवनी मिळाली.
तुल्यबळ अनुभवविश्वाची शिदोरी असलेल्या सानिया-मार्टनिाने एकत्र खेळताना जपलेलं जिंकण्यातलं सातत्य अनोखं आहे. मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत या जोडीने नऊ स्पर्धामध्ये जेतेपदे नावावर केली. सलग २२ सामन्यांमध्ये अपराजित राहण्याचा विक्रमही या जोडीने केला आहे. ‘सॅन्टिना’ या टोपणनावाने प्रसिद्ध झालेल्या या जोडीने एकत्र खेळताना खेळलेल्या ६२ पकी ५५ लढतीत विजय साकारला आहे. स्पध्रेगणिक जेतेपदांची पोतडी भरत जाणाऱ्या या जोडीने दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. दोन बलाढय़ शक्ती एकत्र आल्या की शह-काटशह देण्याची शक्यता असते. सानिया-मार्टनिा एकमेकींना पूरक झाल्या आणि त्यामुळेच प्रतिस्पध्र्याना त्यांच्याविरुद्ध जिंकणे कठीण आहे. सर्वोत्तम खेळणं हा निखळ उद्देश समोर ठेवून त्यांनी खेळायला सुरुवात केली, म्हणूनच त्यांच्या खेळातली सहजता एखाद्या युवा जोडीप्रमाणे आहे. ग्रँडस्लॅम, डब्ल्यूटीए फायनल्सची जेतेपदे या दोघींच्या एकीच्या बळाचं प्रतीक आहेत.

– पराग फाटक 
parag.phatak@expressindia.com