आपल्या एखाद्या जिवलग मित्राचे अकाली निधन झाल्यानंतर त्याचे अपुरे राहिलेले स्वप्न साकार करणे, हेच ऋण समजून त्याची परतफेड करण्यासाठी अखंड काम करणारे क्रीडा संघटक क्वचितच आढळतात. शरीरसौष्ठवपटू नंदू मराठे यांचे अकाली निधन झाले. नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर यश मिळवून देण्याचे त्यांचे स्वप्न अपुरे राहिले. हे स्वप्न साकार करण्याचे काम त्यांचे काही मित्र गेली ५० वर्षे ‘नंदू मराठे श्री’ स्पर्धेद्वारे करीत आहेत. अखंड ५० वर्षे सुरू असलेली शरीरसौष्ठव स्पर्धा कदाचित आपल्या देशातील एकमेव शरीरसौष्ठव स्पर्धा असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठे हे आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या शास्त्र शाखेचे विद्यार्थी होते. महाविद्यालयात असताना त्यांना व्यायामाची विशेषत: शरीरसौष्ठव, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल आदी खेळांची आवड होती. १९६३ ते १९६७ या कालावधीत त्यांनी अनेक स्पर्धामध्ये भाग घेतला. आंतरमहाविद्यालयीन क्रीडा प्रतिनिधी म्हणून काम करताना महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धाच्या प्रसाराचे कार्य त्यांनी केले. महाविद्यालयात आयोजित केलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत ते नेहमीच विजेते असायचे. खेळाडूबरोबरच पंच व संघटक म्हणूनही ते काम करीत असत. शास्त्र शाखेची पदवी मिळवल्यानंतरही त्यांचा ओढा क्रीडा क्षेत्राकडेच होता. या क्षेत्रात त्यांना कारकीर्दही घडवायची होती, मात्र नियती काही वेगळेच घडवत असते. हे करिअर करण्यापूर्वीच १९६८ मध्ये अपघातात त्यांचा मृत्यू झाला व देशाने एक उदयोन्मुख खेळाडू गमावला. त्यांच्या अंत्यसंस्काराचे वेळी त्यांचे जिवलग मित्र उल्हास त्रिमल व जयप्रकाश भट यांनी मराठे यांच्या स्मरणार्थ शरीरसौष्ठव स्पर्धा सुरू करण्याचा निश्चय केला. प्रा. नानासाहेब फटाले, प्रा. डॉ. अरुण दातार तसेच मराठे यांची बहीण उषाताई व मेहुणे सुभाष आपटे यांच्या सहकार्याने त्यांनी १९६८ मध्येच नंदू मराठे श्री ही आंतरमहाविद्यालयीन स्तरावरील शरीरसौष्ठव स्पर्धा सुरू केली. मराठे यांच्या कुटुंबीयांची सर्वार्थाने स्पर्धेसाठी मदत मिळत असते. गरवारे महाविद्यालयाचे त्या वेळचे प्राचार्य नानासाहेब जमदग्नी यांचे मराठे हे लाडके विद्यार्थी होते. त्यामुळे जमदग्नी यांनी ही स्पर्धा दरवर्षी महाविद्यालयात आयोजित केली जाईल असे जाहीर केले. तेव्हापासून गेली ५० वर्षे दरवर्षी मराठे यांच्या जन्मदिवशीच म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी ही स्पर्धा घेतली जात आहे. योगायोगाने हा दिवस राष्ट्रीय स्तरावर क्रीडा दिन म्हणूनही साजरा केला जात असतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाची पर्यायाने निरोगी जीवनाची आवड निर्माण व्हावी हा त्यामागचा हेतू होता. या स्पर्धेसाठी सर्व आर्थिक बाजू त्रिमल, भट व अन्य काही मित्रमंडळीच सांभाळत असतात. अलीकडे महाराष्ट्र बँकेनेही त्यासाठी सहकार्य सुरू केले आहे.

या स्पर्धेतील खेळाडूंचा उत्साह पाहून मध्यंतरी काही प्राध्यापकांनीही आपले शरीरसौष्ठव कौशल्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकरिताही स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेतील अनेक माजी विजेते खेळाडू व्यायामशाळांमध्ये संचालक म्हणून यशस्वी कारकीर्द घडवत आहेत. स्पर्धेच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने गेल्या ५० वर्षांमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंसाठी ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ स्पर्धा घेण्याचे संयोजकांनी ठरवले आहे.

अव्वल दर्जाची स्पर्धा

मराठे-श्री स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद मिळवणारे असीम मिश्रा म्हणाले, ‘‘एकवेळ राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजय मिळवणे सोपे असेल. पण मराठे श्री स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा दर्जा, त्यांची तयारी व स्पर्धेत तपासून घेतली जाणारी अवघड कौशल्य यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने अव्वल दर्जाची आहे. या स्पर्धेमुळे मला निर्भीड व आत्मविश्वासाने जगण्याचे सामथ्र्य दिले. आज बहुराष्ट्रीय कंपनीत मनुष्यबळ विकास व्यवस्थापक म्हणून काम करताना मला या सामर्थ्यांचा खूपच फायदा होत आहे.’’

खेळाडू घडवण्याचे व्यासपीठ

कोणताही खेळाडू एकदम राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवत नाही. स्थानिक स्तरावरील स्पर्धामध्ये तो चमक दाखवू लागल्यानंतर तेथील अनुभवाचा फायदा घेत तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवितो. मराठे-श्री स्पर्धा हे अनेकांसाठी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धासाठी आत्मविश्वास देणारे व्यासपीठ ठरले आहे. सर्वात पहिली स्पर्धा जिंकण्याचा मान लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचा खेळाडू वेदप्रकाश धांड यांनी मिळवला. महादेव सपकाळ, विवेक बागेवाडी, प्रकाश कांबळे, मंगेश परदेशी, राहुल जोरी, असीम मिश्रा यांनी अनेक वेळा या स्पर्धेत विजेतेपद मिळवले. त्यांच्यासाठी शरीरसौष्ठवमधील उत्तम व्यासपीठ होते. त्याचबरोबर मंदार चवरकर, अनिल शिंदे, विक्रम झेंडे, महेश हगवणे, जिमी पटेल आदी खेळाडूंनी येथील अनुभवाचा फायदा घेत राष्ट्रीय स्तरावरही चांगले यश मिळवले.

स्पर्धेने रोजगार दिला

‘‘शरीरसौष्ठव खेळातील पहिले विजेतेपद मला मराठे-श्री स्पर्धेत मिळाले. दोन वेळा मी हा किताब मिळवला. या स्पर्धेतील कामगिरीमुळेच मला कस्टम्समध्ये नोकरी मिळाली. मराठे श्री स्पर्धेत विजेता होणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. या स्पर्धेमुळे माझे जीवन घडले. जीवनात कितीही संकटे आली तरी त्यास निर्धाराने सामोरे जाण्याचे बळ मला या स्पर्धेद्वारे दिले आहे,’’ असे ज्येष्ठ शरीरसौष्ठवपटू विवेक बागेवाडी यांनी सांगितले.

मैत्री असावी तर अशीच

‘‘मैत्री कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठे यांच्या स्मरणार्थ स्पर्धा आयोजित करणारे त्यांचे सवंगडी. अव्याहत ही स्पर्धा सुरू आहे हे त्यांच्या मैत्रीतील अतूट नाते दर्शविते. अतिशय निरपेक्षवृत्तीने ही दोस्तमंडळी स्पर्धा घेत असतात. वरिष्ठ गटाबरोबरच कनिष्ठ गटातील खेळाडूंनाही या स्पर्धेत भाग घेता येतो. कनिष्ठ महाविद्यालयात असतानाच मला हे विजेतेपद मिळवले. ते तीन-चार वेळा टिकविले. तेथूनच माझे शरीरसौष्ठव खेळाचे करिअर घडले. मला समाजात या स्पर्धेमुळेच मानाचे स्थान आहे,’’ असे मंगेश परदेशी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Articles in marathi on bodybuilder nandu marathe