पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १ ऑगस्टपासून अ‍ॅशेस मालिका रंगणार आहे. ही मालिका कायम प्रतिष्ठेची मानली जाते. क्रिकेटमधील या ऐतिहासिक मालिकेत दोन्ही संघ आपली सर्व ताकद झोकून मैदानात खेळ करतात आणि त्यामुळे ही मालिका पाहणे या दोन देशांच्या क्रिकेटप्रेमीसांठी मोठी पर्वणीच असते. या मालिकेत दोनही संघांचे खेळाडू अतिशय आक्रमकपणे खेळताना दिसतात. तसेच मैदानावर स्लेजिंग करण्याचे प्रमाणदेखील भरपूर असते. पण यंदा मात्र मालिकेला सुरु होण्याआधी सराव सत्रातच स्लेजिंगला सुरुवात झाल्याचे दिसून आले.

यंदा या मालिकेचे यजमानपद इंग्लंडकडे असून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दोनही संघ या मालिकेच्या विजयासाठी कसून परिश्रम करत आहेत. अ‍ॅशेस मालिकेतील पहिला सामना एजबॅस्टन येथे होणार आहे. या कसोटी सामन्याआधी दोनही संघांनी जोरदार सराव केला. पण ऑस्ट्रेलिया संघ एजबॅस्टन येथे प्रशिक्षण करण्यास आला, तेव्हा तेथे वेगळेच चित्र दिसून आले.

विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला. हा सामनादेखील एजबॅस्टनच्या मैदानात खेळला गेला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ ‘अ‍ॅशेस’चा सराव करण्यासाठी जेव्हा तेथे आला, तेव्हा त्या मैदानावरील स्कोअरकार्डवर इंग्लंड-ऑस्ट्रेलियामधील ‘त्या’ सामन्यातील अंतिम धावफलक लावण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी याने ट्विट करत याची माहिती दिली.

सरावापासूनच या मालिकेत स्लेजिंगला सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे मालिका रंगतदार होणार हे नक्की आहे. याशिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच पांढऱ्या जर्सीवर खेळाडूंची नावे आणि क्रमांक असणार आहेत.