दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंडच्या दौऱ्यावरील विजयाचा दुष्काळ संपवताना अखेर भारतीय संघाने महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला आशिया चषकामध्ये दणक्यात महा‘विराट’रात्र साजरी केली. विराट कोहलीचे दमदार शतक आणि त्याला अर्धशतकवीर अजिंक्य रहाणेच्या मिळालेल्या सुयोग्य साथीच्या जोरावर भारताने बांगलादेशवर सहा विकेट्स आणि सहा चेंडू राखत सहजपणे विजय संपादन केला. कर्णधार मुशफिकर रहिमच्या शतकाच्या जोरावर बांगलादेशने ७ बाद २७९ अशी मजल मारली होती, पण भारताने हे आव्हान सहजपणे पार केले. या सामन्यात दोन्ही कर्णधारांनी शतके झळकावली असली तरी ज्याने संघाला विजय मिळवून दिला, त्या कोहलीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
बांगलादेशच्या २८० धावांचा पाठलाग करताना भारताने ५० धावांची सलामी दिली खरी, पण त्यानंतर दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाले. २ बाद ५४ अशी स्थिती असताना कोहली आणि रहाणे यांनी तिसऱ्या विकेटसाठी २१३ धावांची भागीदारी रचत संघाचा विजय सुकर करून दिला. कोहलीने १२२ चेंडूंत १६ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर १३६ धावांची अप्रतिम खेळी साकारली. त्याचे हे कारकिर्दीतील १९वे शतक असून यामध्ये १८ वेळा भारतीय संघ विजयी ठरला आहे. त्याचे बांगलादेशविरुद्धचे आणि कर्णधारपद सांभाळताना तिसरे शतक आहे, तर या वर्षांतील दुसरे शतक आहे. अजिंक्यनेही कोहलीला चांगली साथ देत ७ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७३ धावांची खेळी साकारली.
तत्पूर्वी, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नाणेफेक जिंकत बांगलादेशला फलंदाजीला पाचारण केले आणि त्यांची १३ षटकांमध्ये २ बाद ४९ अशी स्थिती करत त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पण कर्णधार रहिम आणि सलामीवीर अनामुल हक (७७) यांनी भारतीय गोलंदाजांना न जुमानता तिसऱ्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी रचत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. हक बाद झाला तरी रहिमने एका बाजूने दमदार फलंदाजी केली, पण समोरच्या टोकाकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने बांगलादेशला तीनशे धावांचा उंबरठा ओलांडता आला नाही. रहिमचा अडसर यावेळी वेगवान गोलंदाज वरुण आरोनने काढला. परंतु त्यानंतरच्याच ३९व्या षटकातील पाच चेंडूंवर रहिमने १६ धावा लुटल्या. पण सहाव्या चेंडूवर आरोनने ‘बीमर’ टाकला आणि तो थेट रहिमच्या छातीवर लागला. पण रहिम डगमगला नाही, वैद्यकीय उपचार घेतल्यावर पुन्हा एकदा जोमाने फलंदाजी करत त्याने कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. रहिमने ११३ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ११७ धावांची खणखणीत खेळी साकारली.
भारताकडून मोहम्मद शमीने चार बळी मिळवले, तर वरुण आरोन हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. ७.५ षटकांमध्ये आरोनला ७४ धावा मोजाव्या लागल्या. बांगलादेशने यापूर्वी संयुक्त अरब अमिरातीच्या खर्राम खानच्या गोलंदाजीवर सर्वाधिक ७८ धावा वसूल केल्या होत्या.
धावफलक
बांगलादेश : अनामुल हक त्रि. गो. आरोन ७७, शमसूर रहमान झे. व गो. शमी ७, मोनिमुल हक यष्टीचित कार्तिक गो. अश्विन २३, मुशफिकर रहिम झे. रोहित गो. शामी ११७, नईम इस्लाम झे. अश्विन गो. शमी १४, नसीर होसेन झे. कार्तिक गो. शमी १, झिआऊर रहमान झे. आरोन गो. कुमार १८, शोहाग गाझी नाबाद ३, मश्रफी मोर्तझा नाबाद १, अवांतर (बाइज १, लेग बाइज ३, वाइड १२, नो बॉल २) १८, एकूण ५० षटकांत ७ बाद २७९.
बाद क्रम : १-१६, २-४९, ३-१८२, ४-२३१, ५-२४१, ६-२७०, ७-२७६.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ७.५-०-७४-१, मोहम्मद शमी १०-१-५०-४, आर. अश्विन १०-१-५०-१, रवींद्र जडेजा १०-०-३७-०, अंबाती रायुडू ३-०-१७-०, विराट कोहली १.१-०-६-०.
भारत : रोहित शर्मा त्रि. गो. झिआऊर रहमान २१, शिखर धवन पायचीत गो. अब्दुर रझाक २८, विराट कोहली झे. रुबेल गो. होसेन १३६, अजिंक्य रहाणे झे. कायेस गो. गाझी ७३, अंबाती रायुडू नाबाद ९, दिनेश कार्तिक नाबाद २, अवांतर (लेग बाइज १, वाइड ९, नो बॉल १) ११, एकूण ४९ षटकांत ४ बाद २८०.
बाद क्रम : १-५०, २-५४, ३-२६७, ४-२७२.
गोलंदाजी : मश्रफी मोर्तझा ९-१-४४-०, रुबेल होसेन १०-१-६३-१, अब्दूर रझाक १०-०-५५-१, झिआऊर रेहमान ५-०-२०-१, शोहाग गाझी ८-०-४९-१, मोनिमुल हक २-०-१३-०, नइम इस्लाम १-०-१५-०, नसिर हुसैन ४-०-२०-०.
सामनावीर : विराट कोहली.