Pakistan Cricket Team Press Conference: पाकिस्तान क्रिकेट संघाला आशिया चषक २०२५ स्पर्धेत एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसले आहेत. रविवारी झालेल्या सामन्यान पाकिस्तानला भारतीय संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. हे पीसीबीला पटलं नव्हतं. त्यामुळे पीसीबीने आयसीसीकडे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना स्पर्धेबाहेर करण्याची मागणी केली होती. मात्र, आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली आहे. आता पाकिस्तानने यूएईविरूद्ध होणाऱ्या सामन्याआधी मोठा निर्णय घेतला आहे.
बुधवारी आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान आणि यूएई हे दोन्ही संघ भिडणार आहेत. हा सामना सुपर ४ मध्ये प्रवेश करण्यासाठी पाकिस्तान संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. मात्र, या सामन्याआधी होणारी पत्रकार परिषद पाकिस्तान संघाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक सामन्याच्या आदल्या दिवशी कर्णधाराची पत्रकार परिषद होते. त्यामुळे आज पाकिस्तान आणि यूएईच्या कर्णधाराची पत्रकार परिषद होणार होती. पण पाकिस्तानने ही पत्रकार परिषद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. भारतीय संघाविरूद्ध झालेल्या सामन्यापासून पाकिस्तानचा संघ तुफान चर्चेत आहे. आता निषेध नोंदवण्यासाठी पाकिस्तानच्या कर्णधाराने पत्रकार परिषद रद्द केली असल्याची चर्चा रंगली आहे.
यूएईविरूद्ध होणारा सामना हा पाकिस्तानसाठी स्पर्धेत पुढे जाण्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. हा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानचा संघ यूएईविरूद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार तर टाकणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीच्या वेळी आणि सामना संपल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. यावरून पीसीबीने सामनाधिकारी अँडि पायक्रॉप्ट यांची तक्रार आयसीसीकडे केली होती. पण आयसीसीने पीसीबीने केलेली मागणी फेटाळून लावली. पीसीबीने आरोप करत म्हटले होते की, जर आयसीसीने अँडी पायक्रॉफ्ट यांच्या बाजूने निर्णय दिला, तर पाकिस्तानचा संघ आशिया चषक २०२५ स्पर्धेवर बहिष्कार टाकेल. पण पीसीबीने असं काहीच केलेलं नाही. आता पाकिस्तान- यूएई सामना होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.