India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुपर ४ फेरीतील सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला. याआधी झालेल्या साखळी फेरीतील सामन्यातही भारताने पाकिस्तानवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती. या सामन्यात हस्तांदोलन न करण्याचा वाद चांगलाच रंगला होता. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी हद्द पार केली. आधी फरहानने बंदुकीचं सेलिब्रेशन केलं. त्यानंतर हरिस रौफने नको ते हातवारे करून भारतीय क्रिकेट चाहत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. दरम्यान रौफ आणि शाहीन आफ्रिदीने अभिषेक शर्मासोबत बाचाबाची देखील केली. यावर आता भारतीय प्रशिक्षकाने मोठं वक्तव्य केलं आहे.

भारतीय संघाचा सुपर ४ फेरीतील दुसरा सामना बांगलादेशविरूद्ध होणार आहे. या सामन्याच्या १ दिवसाआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सहाय्यक प्रशिक्षक रायन डे डोशेटने पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यातील वादावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. या सामन्यात हरिस रौफने सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना वादग्रस्त इशारा केला होता. या वादावर प्रतिक्रीया देताना रायन डे डोशेट म्हणाला, “आमचं लक्ष क्रिकेटवर केंद्रीत होतं. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी जे काही केलं, त्यामुळे आमचा ताबा सुटला असता. पण आमच्या खेळाडूंनी केवळ चांगला खेळ कसा करता येईल यावर लक्ष केंद्रीत केलं. आमच्या खेळाडूंनी त्यांना बॅटने उत्तर दिलं.”

पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंच लक्ष विचलित करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण भारतीय खेळाडूंनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि दिलेल्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. सामन्यातील पहिल्या डावात साहिबजादा फरहानने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बंदुकीचं सेलिब्रेशन केलं. त्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना हरिस रौफने वादग्रस्त इशारे केले होते. भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना पहिल्याच षटकात शाहीन आफ्रिदीने अभिषेक शर्माला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हरिस रौफने पुन्हा एकदा अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलला डिवचण्याचा प्रयत्न केला.

भारतीय संघाचा दमदार विजय

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानला २० षटकांअखेर ५ गडी बाद १७१ धावा करता आल्या. पाकिस्तानकडून फलंदाजी करताना साहिबजादा फरहानने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली. तर सईम अयुबने २१ धावांची खेळी केली. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली. तर शुबमन गिलने ४७ धावा केल्या. शेवटी तिलक वर्माने नाबाद ३० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने या सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला.