Asia Cup Reserve Day Rules भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघ दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर जेतेपदाची ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. याआधी हे दोन्ही संघ या स्पर्धेत दोनदा आमनेसामने आले होते. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर एकतर्फी विजयाची नोंद केली. त्यामुळे भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. दरम्यान भारतीय संघ विजयाची मालिका सुरू ठेवून जेतेपदाची ट्रॉफी उंचावणार की पाकिस्तानचा संघ जिंकणार हे पाहणं महत्वाचं असेलच पण सामना पावसामुळे रद्द झाला तर पर्याय काय असेल? राखीव दिवस असेल का? हे आपण आता जाणून घेऊ.

राखीव दिवस असणार की नाही?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना आज खराब हवामान किंवा पाऊस यापैकी कुठल्याही कारणामुळे रद्द झाला तर २९ सप्टेंबरला अर्थात सोमवारी हा सामना खेळवण्यात येईल. खरंतर संपूर्ण मालिकेत पावसाचा अडथळा आलेला नाही. त्यामुळे आजही पाऊस येईल किंवा इतर कुठला व्यत्यय येईल असं वाटत नाही. पण तसं घडलंच तर एशियन क्रिकेट कौन्सिलने सोमवारी हा सामना खेळवण्यासाठीचा दिवस राखीव ठेवला आहे.

एसीसीची नियमावली काय?

एसीसीच्या नियमावलीननुसार कुठल्याही कारणामुळे म्हणजेच पाऊस, खराब हवामान किंवा इतर कुठल्याही कारणामुळे भारत आणि पाकिस्तान सामना रद्द झाला तर तो राखीव दिवसाच्या दिवशी खेळवला जाईल. त्यादिवशीही जर हवामान खराब असेल, पाऊस असेल किंवा इतर कुठल्याही कारणाने सामना रद्द करावा लागला तर आशिया चषक २०२५ हा दोन्ही देशांमध्ये विभागून दिला जाईल. समजा असं घडलं तर आशिया चषकाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातली ही पहिली घटना असेल. कारण आत्तापर्यंत एकाही आशिया चषक मालिकेत दोन संघांना विभागून चषक दिला गेलेला नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

दुबईत किती तापमानाची नोंद?

दरम्यान रविवारच्या दुबईच्या तापमानाचा विचार केला तर तर ३८ अंश सेल्सीयस इतकं नोंदवलं गेलं आहे. तर ४२ अंश तापमान आहे की काय असं वाटतं आहे. ही परिस्थितीही खेळाडूंसाठी आव्हानात्मक ठरु शकते. भारताकडून सलामीचा फलंदाज म्हणून अभिषेक शर्मा येईल. संपूर्ण मालिकेत त्याने त्याच्या तळपत्या बॅटची किमया दाखवून देत ३०९ धावा केल्या आहेत. यामध्ये चौकार आणि षटकांराचाही समावेश आहे. यामध्ये त्याच्या तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तर आजपर्यंत पार पडलेल्या मालिकेत त्याने सर्वाधिक ७५ धावा करुन बेस्ट स्कोअरही केला आहे.

दोन्ही संघांत चांगले खेळाडू

पाकिस्तानच्या संघाचा विचार केला तर पाकिस्तानकडे शाहीन आफ्रिदी हा चांगला गोलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंतच्या मालिकेत नऊ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे विकेट टेकर्सच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आला आहे. शाहिन आफ्रिदी आक्रमकपणे खेळतो हे दिसून आलं आहे. त्याचप्रमाणे अभिषेक शर्माही त्याला चोख उत्तर देतो हे देखील दिसून आलं आहे. या दोघांमधली शाब्दिक चकमकही चर्चेचा विषय ठरली होती. आता मैदानावर आज या दोघांमध्ये पुन्हा एकदा असाच काही वाद रंगतोय का? हे पाहणंही महत्त्वाचं असेल.