India vs Pakistan, Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ स्पर्धेचा थरार दुबईत सुरू आहे. या स्पर्धेतील मुख्य आकर्षण भारत- पाकिस्तान सामना येत्या १४ सप्टेंबरला रंगणार आहे. या सामन्याला क्रिकेट चाहत्यांसह अनेक दिग्गज खेळाडूंनी विरोध केला. मात्र, भारत सरकारने या सामन्यासाठी होकार दिला आहे. त्यामुळे हा सामना होणार हे निश्चित झालं आहे. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने हा सामना पाहणार नसल्याचं म्हटलं आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने आशिया चषकात होणाऱ्या भारत- पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना त्याला भारत- पाकिस्तान सामन्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना मनोज तिवारी म्हणाला, ” पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं हे चुकीचं आहे. हे आपल्या लोकांच्या बलिदानाचा अपमान ठरेल. बीसीसीआयसोबत असलेल्या करारामुळे खेळाडू यावर बोलणं टाळतात. पण केंद्र सरकार आणि बीसीसीआयने हा सामना होऊ देऊ नये.”
तसेच तो पुढे म्हणाला, ” स्पर्धेतील इतर सामने होऊ द्या, पण भारत- पाकिस्तान सामना नको. भारत- पाकिस्ताना सामना का होतोय? पाकिस्तानातून दहशतवादी येतात आणि आमच्या निर्दोष लोकांना मारतात. त्यामुळे पाकिस्तानसोबत खेळण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. “
तसेच तो पुढे म्हणाला, ” दहशतवादी भारतात येऊन दहशतवाद पसरवतात हे पाकिस्तानला चांगलं माहित आहे, तरीदेखील ते त्यांना थांबवू शकत नाही. आपलं सरकार काय करत आहे? पहलगाम हल्ला इतक्या लवकर विसरले का? आमच्या निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देणं थांबवत नाही. तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत क्रिकेट खेळू शकत नाही.”
हा सामना येत्या १४ सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे हा सामना होणार की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याआधी लेजेंड्स लीग स्पर्धेत पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने माघार घेतली होती. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला होता.