अम्मान (जॉर्डन) : सहा वेळा विश्वविजेती एमसी मेरी कोम (५१ किलो) आणि अमित पंघाल (५२ किलो) हे भारतीय बॉक्सिंगपटू टोक्यो ऑलिम्पिक पात्रतेपासून ती एका विजयाच्या अंतरावर आहे. शनिवारी या दोघांनी आशियाई ऑलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. ३७ वर्षीय मेरी कोमने न्यूझीलंडच्या टॅमिन बेन्नीचा ५-० असा धुव्वा उडवला. उपांत्यपूर्व सामन्यात मेरीची फिलिपाइन्सच्या इरिश मॅग्नोशी गाठ पडणाार आहे.

२३ वर्षीय अग्रमानांकित अमितने मोंगोलियाच्या इन्खमानाडख खारखूविरुद्ध ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवला. उपांत्यपूर्व सामन्यात अमितची फिलिपाइन्सच्या कार्लो पालमशी गाठ पडणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या गौरव सोलंकीने (५७ किलो) अग्रमानांकित मिराझिझबेक मिर्झाखालीलोव्हकडून १-४ अशी हार पत्करल्यामुळे त्याचे आव्हान संपुष्टात आले.

सुरुवातीपासूनच मी आक्रमकतेची आखलेली रणनीती फलदायी ठरली. माझ्या कामगिरीबाबत मी समाधानी आहे.

– एमसी मेरी कोम