आशियाई स्पर्धेवर १६ पदकांसह भारताची छाप

आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या शानदार अभियानाची भारतीय मल्लांनी एकूण १६ पदकांची लयलूट करीत सांगता केली. रविवारी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी ग्रीको-रोमन मल्लांनी एक रौप्य आणि एक कांस्य पदकाची कमाई केली.

८२ किलो वजनी गटात हरप्रीत सिंगने रौप्यपदक मिळवले, तर ६० किलोमध्ये ग्यानेंद्रने कांस्य पदक प्राप्त केले. भारताच्या एकंदर १६ पदकांमध्ये एक सुवर्ण, सहा रौप्य आणि नऊ कांस्यपदकांचा समावेश आहे. हरप्रीतने दिमाखदार कामगिरीसह अंतिम फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत त्याने किर्गिझस्तानच्या बुर्गो बेशालीव्हचा ५-१ असा पाडाव केल्यानंतर उपांत्य फेरीत चीनच्या हैताओ क्युआनला १०-१ असे नामोहरम केले. मग अंतिम सामन्यात इराणच्या सईद मोराद अब्दावालीने त्याला ८-० असे पराभूत केले.

त्याआधी, ग्यानेंद्रने तैपेईच्या जुय चि ह्युआंगचा ९-० पराभव करून कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले. ग्यानेंद्रने उपांत्यपूर्व फेरीत जॉर्डनच्या अली अबीद अल्नासीर अली अबूसैफचा ९-१ असा पराभव केला. परंतु उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या इस्लोमजोन बखरामोव्हने त्याला ९-० असे पराभूत केले. पण इस्लोमजोनने अंतिम फेरी गाठल्यामुळे ग्यानेंद्रला कांस्यपदकाच्या लढतीची संधी मिळाली.

७२ किलो वजनी गटात योगेशचे कांस्यपदक हुकले. किर्गिझस्तानच्या रुसलान टॅरेव्हने त्याचा ८-० असा पराभव केला. याशिवाय ९७ किलो गटात रविंदरचे आव्हान पात्रता लढतीत संपुष्टात आले, तर ९७ किलो गटात हरदीपचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला.