भारतीय क्रिकेट संघातील काही मोठे व अनुभवी खेळाडू सोडून गेल्यानंतर नव्या खेळाडूंना रुळायला वेळ लागणार आहे. त्यामुळे नवोदित खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यमापन लगेच नाही, तर हे खेळाडू काही दिवस खेळल्यानंतर करायला हवे. या मालिकेत फलंदाज आणि वेगवान गोलंदाज यांची कामगिरी अपेक्षेनुरूप न झाल्याने आमचा पराभव झाला, असे मत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
भारताने नागपूरचा चौथा सामना गमावून इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली आहे. त्याची कारणमीमांसा विचारली असता धोनीने सांगितले की, चौथ्या सामन्यात आम्ही १० तास गोलंदाजी करून केवळ ३ गडी बाद करू शकलो. या पाश्र्वभूमीवर आम्हाला प्रत्येक गोष्टीचे मूल्यमापन करावे लागेल. विजयासाठी प्रयत्न करताना खेळपट्टीनेही साथ देणे आवश्यक असते. पहिल्या दिवशी खेळपट्टी अगदीच कठीण होती, ती आज पाचव्या दिवशी फलंदाजांना अनुकूल झाली. शिवाय भारताचे काही मोठे खेळाडू सोडून गेले असून नव्यांना रुळायला वेळ लागेल. या नवोदित खेळाडूंना संधी दिल्याशिवाय ते चांगले आहेत की नाही हे कसे कळणार? मात्र नवोदितांच्या कामगिरीबद्दल लगेच बोलणे उचित नसून, ते काही दिवस खेळल्यानंतर त्यांची कामगिरी कशी आहे ते ठरवावे लागेल. केवळ त्यांनी आता किती धावा काढल्या किंवा किती बळी घेतले हे पाहून ते ठरवू नये.