Basit Ali slams Pakistan Ahead of IND vs PAK Asia Cup Match: आशिया कप २०२५ येत्या ९ सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. यामधील बहुप्रतिक्षित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. क्रिकेटप्रेमींच्या नजरा या सामन्यावर आहेत. पण यादरम्यान भारताने पाकिस्तानविरूद्ध आशिया कपमध्ये खेळण्यावर बहिष्कार टाकावा अशी मागणी केली जात आहे. पण दरम्यान पाकिस्तानच्या खेळाडूने मात्र भलतंच वक्तव्य करत आपल्या देशाची लाज काढली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत पाक संघाचा माजी खेळाडू बासित अलीने मोठं वक्तव्य केलं आहे. बासित अलीने पाकिस्तान संघालाच कमी लेखत भारताने आशिया चषकातील सामना रद्द करावा यासाठी मी प्रार्थना करतो असं म्हटलं आहे. यामागचं कारणही त्याने सांगितलं आहे.

अलिकडेच, पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्ध खूपच खराब कामगिरी केली. वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-१ असा विजय मिळवला. दोन्ही संघांमधील तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला जिंकण्यासाठी २९५ धावांची आवश्यकता होती, पण पाक संघ ९२ धावांवर सर्वबाद झाला.

पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं भारत-पाकिस्तान सामन्यावर मोठं वक्तव्य

पाकिस्तानच्या या दारूण पराभवानंतर बासित अलीने द गेम प्लॅन यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटलं की, “मी प्रार्थना करतो की भारत वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स सामन्याप्रमाणे आशिया कप सामन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देईल. जर असं झालं नाही तर भारताचा संघ पाकिस्तानचा इतका मानहानीकारक पराभव करेल की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.”

यूट्यूब चॅनेलच्या होस्टने हसत हसत म्हटलं की जर अफगाणिस्तानने या स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत केलं तरी चकित होण्यासारखं काही नसेल. यावर बासित अली म्हणाला, “जर आपण अफगाणिस्तानकडून हरलो तर देशातील कोणालाही फारसा फरक पडणार नाही, पण जर आपला संघ भारताकडून हरला तर सगळे वेडे होतील.”

आशिया कप २०२५ ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. दोन्ही संघांनी स्पर्धेसाठी आपला संघ अद्याप जाहीर केलेला नाही. भारताचा पाकिस्तानविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये दमदार रेकॉर्ड आहे, दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या १३ पैकी दहा सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकादरम्यान दोन्ही संघांमध्ये अखेरचा सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान १२० धावांचे लक्ष्यही गाठू शकला नाही आणि त्यांना सहा धावांनी पराभव पत्करावा लागला.

अलिकडच्या काळात पाकिस्तानला अमेरिका, झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान सारख्या साधारण संघांविरुद्ध अनेक मानहानीकारक पराभवांना सामोरे जावे लागले आहे. आशिया कपमध्ये पाकिस्तान कशी कामगिरी करणार यावरही सर्वांच्या नजरा असतील.