आज बीसीसीआय नमन अवॉर्ड्स २०२३-२४ चा पुरस्कार सोहळा सुरू आहे. या पुरस्कार सोहळ्यात अनेक खेळाडूंना पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. यादरम्यान जसप्रीत बुमराहला मोठा पुरस्कार देण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सामन्यांमध्ये भेदक गोलंदाजी करत भारतासाठी अनेक सामने जिंकले आहेत. बुमराहने प्रत्येक फॉरमॅटमध्ये चमत्कार करत सामन्याचा रोख बदलला. त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठ्या पुरस्काराने सन्मानित केले आहे. बुमराहची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून निवड झाली आहे. त्याला पॉली उमरीगर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

बुमराहची २०२३-२४ या वर्षासाठी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. बुमराहने आतापर्यंत टीम इंडियासाठी कसोटीत २०५ विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने १४९ विकेट घेतल्या आहेत. बुमराहने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ८९ विकेट घेतल्या आहेत. त्याने आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली आहे. नुकताच बुमराहला आयसीसीचा सर्वाेत्कृष्ट क्रिकेटपटू २०२४ चा पुरस्कारही मिळाला.

पॉली उमरीगर पुरस्कार बीसीसीआयच्या सर्वात मोठ्या पुरस्कारांच्या यादीत समाविष्ट आहे. या पुरस्कारासह बीसीसीआय रोख बक्षीसाची रक्कमही देते. विजेत्या खेळाडूला या विजेतेपदासाठी १५ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. बुमराहला तिसऱ्यांदा पॉली उमरीगर विजेतेपद मिळाले आहे. २०१८-१९ हंगामासाठी त्याला हे विजेतेपद मिळाले होते. यानंतर २०२१-२२ मध्येही तो या पुरस्काराचा मानकरी ठरला होता. तर शुबमन गिलला २०२२-२३ हंगामासाठी पॉली उमरीगर पुरस्कार देण्यात आला होता.

जसप्रीत बुमराहसह स्मृती मानधनाला महिला सर्वात्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला आहे. याबरोबरच रवीचंद्रन अश्विनला त्याच्या उत्कृष्ट कारकिर्दीसाठी बीसीसीआयचा स्पेशल अवॉर्ड देण्यात आला. तर देशांतर्गत क्रिकेटपटूंनाही त्यांच्या कामगिरीसाठी अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci awards 2024 jasprit bumrah won polly umrigar award for being the best international cricketer 2023 24 bdg