कसोटी मालिका २-१ अशी असताना मँचेस्टरमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात शेवटचा म्हणचे पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार होता. पण करोनाने टीम इंडियाच्या शिबिरात प्रवेश केल्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) यांनी हा सामना रद्द केला आहे. ईसीबीने ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे खेळाडूंनाही करोना संसर्गाचा धोका असल्याने कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आपले म्हणणे ट्विटरद्वारे जाहीर केले.

शाह म्हणाले, ”भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ (ईसीबी) सह संयुक्तपणे भारताच्या इंग्लंड दौऱ्यात मँचेस्टर येथील पाचवी कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय आणि ईसीबीने कसोटी सामना खेळवण्याच्या हेतूने सर्व प्रयत्न केले, पण करोनामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. बीसीसीआय आणि ईसीबी यांच्यातील मजबूत संबंधांच्या आधारे, बीसीसीआयने ईसीबीला रद्द झालेल्या कसोटी सामन्याचे पुन्हा आयोजन करण्याची ऑफर दिली आहे. दोन्ही बोर्ड या कसोटी सामन्याचे आयोजन करण्यासाठी एक विंडो शोधण्याच्या दिशेने काम करतील.”

 

हेही वाचा – T20 World Cup: राशिद खाननं राजीनामा दिल्यानंतर अफगाणिस्तानला मिळाला ‘नवा’ कर्णधार!

शाह पुढे म्हणाले, ”बीसीसीआयने नेहमीच असे म्हटले आहे, की खेळाडूंची सुरक्षा आणि कल्याणाला सर्वोच्च महत्त्व आहे आणि या पैलूवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या कठीण काळात ईसीबीने सहकार्य केल्याबद्दल बीसीसीआयचे आभार मानले. मनोरंजक मालिका पूर्ण करू न शकल्याबद्दल आम्ही चाहत्यांची माफी मागू इच्छितो.”

आधीच बसलाय करोनाचा फटका…

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांच्यानंतर परमार यांना करोनाची लागण झाल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला गुरुवारचे सराव सत्र रद्द करावे लागले. संघामधील सर्व खेळाडूंच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या. सावधगिरी म्हणून भारतीय चमूला आपापल्या खोलीत थांबण्याचे निर्देश देण्यात आले होते. शास्त्री यांच्या संपर्कातील भारताचे मुख्य फिजिओ नितीन पटेल सध्या विलगीकरणात असल्यामुळे पाचव्या कसोटीस संघासोबत फिजिओ नव्हते. क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आर. श्रीधरसुद्धा विलगीकरणात असून, फक्त फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड संघासोबत आहेत. सर्व खेळाडू आणि मार्गदर्शकांचे लसीकरण पूर्ण झाले असले तरी इंग्लंडमध्ये जनजीवन पूर्वपदावर आल्यामुळे दोन्ही संघांमधील खेळाडू सध्या जैव-सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करीत नाहीत. लंडनमध्ये पुस्तक प्रकाशनाच्या सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शास्त्री यांना करोनाची लक्षणे आढळून आली आहेत. या कार्यक्रमाला अरुण, पटेल आणि श्रीधर यांनीही हजेरी लावली होती.