बीसीसीआयने अर्ज मागवले
भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना मुदतवाढ देणार नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी स्पष्ट केले. कुंबळे यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कालावधी चॅम्पियन्स क्रिकेट करंडक स्पर्धेनंतर संपुष्टात येणार आहे. त्यानंतर प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीपुढे प्रशिक्षकपदाचे अर्ज ठेवण्यात येतील आणि ते याबाबत अंतिम निर्णय घेतील. प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची ३१ मे ही तारीख ठरवण्यात आली आहे.
खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या करारामध्ये बीसीसीआयने वाढ करावी, अशी भूमिका कुंबळे यांनी काही दिवसांपूर्वी मांडली होती. त्यांचे हे वागणे बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पटले नाही. त्यामुळे कुंबळे यांना मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
‘‘प्रत्येक प्रक्रिया ही पारदर्शक असायला हवी. त्यासाठी आम्ही प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. क्रिकेट सल्लागार समिती हे सर्व कामकाज पाहणार आहे; पण त्यांच्याबरोबर पूर्ण प्रक्रियेमध्ये प्रशासकीय समितीही असेल,’’ असे बीसीसीआयने पत्रकात म्हटले आहे.
कुंबळे यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने मायदेशात १३ कसोटी सामने खेळले, यापैकी १० सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवता आला होता. या १३ कसोटी सामन्यांमध्ये भारताला फक्त एकाच सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्याचबरोबर कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने वेस्ट इंडिजमध्येही कसोटी मालिका जिंकली होती.
‘‘आपल्या व खेळाडूंच्या करारात २५ टक्क्य़ांनी वाढ करावी, अशी मागणी कुंबळे यांनी केली होती. त्यांची ही मागणी अनाकलनीय अशीच आहे. ते प्रशिक्षक पदावर असताना त्यांनी ही मागणी केली आहे; पण जर त्यांच्याकडे हे पद नसेल तर ते मागणी करूच शकत नाहीत. त्यामुळे याप्रकरणी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेपर्यंत बीसीसीआय वाट पाहणार असून त्यानंतर निर्णय जाहीर करणार आहे,’’ असे सूत्रांनी सांगितले.