भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला प्रसारमाध्यमांशी आणि चाहत्यांशी संवाद साधताना जरा नम्रतेने वाग, अशी ताकीद BCCIच्या प्रशासकीय समितीने (CoA) दिल्याची बातमी काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राने प्रकाशित केली होती. ही बातमी खोटी असून अशाप्रकाराची कोणतीही ताकीद बीसीसीआयच्या कोणत्याही समितीकडून अथवा अधिकाऱ्यांकडून विराटला देण्यात अली नसल्याचे बीसीसीआयने जारी केलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून २१ नोव्हेंबरपासून यजमानांविरुद्ध टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर विराटला समितीने विराटला तंबी दिल्याचे वृत्त मुंबईमधील एका वृत्तपत्राने १७ नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित केले होते. हे वृत्त बिसीसीआयने फेटाळून लावले आहे.

यासंदर्भात बीसीसीआयने आपल्या वेबसाईटवर औपचारिक पत्रकच जारी केले आहे. यामध्ये त्यांनी मुंबईतील एका वृत्तपत्राने विराटला बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीकडून वर्तवणूकीसंदर्भात ताकीद देण्यात आल्याचे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे.

विराटने चाहत्याला देश सोडून जाण्याचा सल्ला दिल्यानंतर अनेकांनी विराटवर टिका केली होती. भारतीय फलंदाजीत विशेष काहीच नाही. त्यांच्यापेक्षा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अधिक चांगले खेळतात, असं एका चाहत्यानं म्हटलं होते. त्यावर विराट कोहलीचा पारा चढला आणि त्याने क्रिकेट चाहत्याला थेट देश सोडून जाण्याचा सल्ला दिला होता. परदेशी खेळाडू आवडत असतील, तर खुशाल देश सोडून जा, असे विराटनं म्हटले होते. यानंतर विराटवर चांगलीच टिका झाली. त्याला सोशल नेटवर्किंगवर ट्रोलही करण्यात आले. बीसीसीआयने यासंदर्भात विराटवर कारवाई करावी अशी मागणी नेटकऱ्यांनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर १७ नोव्हेंबर रोजी जरा नम्रतेने वाग! अशी वॉर्निंग बीसीसीआयने दिल्याचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. मात्र आता हे वृत्त खोटे असल्याचे बीसीसीआयनेच सांगितले आहे. असे असले तरी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विराटचे एकदम शांत रुप सर्वांना दिसले. त्यामुळे हा बदल ऐच्छिक आहे की त्यामागे वेगळेच कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरी विराटमधील हा बदल मैदानावर टिकून राहतो का हे आता दौऱ्यातच समजेल.